

दापोली : गेले वर्षभर खेड, दापोली या मुख्य महामार्गाचे काम सुरू असून, पावसाळ्यापासून या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचा वारंवार अनुभव येत आहे. सुरुवातीला ‘किमान काम तरी सुरू आहे’ या भूमिकेतून नागरिकांनी व प्रवाशांनी दुर्लक्ष केले. मात्र याच दुर्लक्षाचा फायदा घेत ठेकेदार व संबंधित अधिकार्यांनी कामाच्या दर्जाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होत आहे.
रस्त्यावर नुकतेच भरलेले खड्डे अवघ्या दोन दिवसांत उखडत असून, डांबराऐवजी खडीच अधिक टाकली जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी 100 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाल्याचे समजते. इतका मोठा निधी उपलब्ध असतानाही कामाचा दर्जा अत्यंत ढिसाळ असल्याने, हा निधी नेमका कुठे खर्च होत आहे, असा सवाल सामन्य नागरिक उपस्थित करत आहेत.
आजही खेड, दापोली मार्गावर असंख्य खड्डे असून, विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणार्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांना जोरदार धक्के बसत असून अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, संबंधित यंत्रणा या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे एकूण परिस्थितीतून स्पष्ट होत आहे.
भरलेले खड्डे दोन-दोन दिवसांत उखडत असल्याने, ठेकेदाराला डांबर कमी पडले का, की कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला जात आहे, असा प्रश्न प्रवासी, नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या कामाबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी अधिक माहिती मिळावी याबाबत संपर्क होत नाही.