

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील मुख्य बाजारपेठेत असणार्या यामिनी हार्डवेअर अँड सेल्स या दुकानाला आग लागून गोडावून खाक झाले. आगीची घटना रविवारी (दि. 7 डिसेंबर) सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत खंडाळा येथील व्यावसायिक मोहनलाल चौधरी यांचे सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान आहे. या घटनेचा पंचनामा जयगड पोलिसांनी केला आहे.
याबाबत माहिती अशी, रविवारी सकाळी नऊ वाजता हार्डवेअर दुकान उघडल्यानंतर दुकानाला आग लागल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मोहनलाल चौधरी यांना ही माहिती दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी जिंदल कंपनीचे अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यांनी ही आग नियंत्रणात आणली.
मात्र तोपर्यंत दुकानातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले होते. तसेच कारही भस्मसात झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी विलास दीडपिसे आणि हेड कॉन्स्टेबल मंदार मोहिते करीत आहेत.