

Kashedi Ghat tunnel power supply
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील (क्र. ६६) कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही भुयारी मार्गांना अखेर वीजपुरवठा सुरू झाला असून, प्रकाशझोत व व्हेंटिलेशनसाठीचे एक्झॉस्ट फॅन्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही टनेल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. परिणामी, कोकणात प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा मार्ग खुला झाला आहे.
भुयारी मार्गातील वीजपुरवठा आणि सुरक्षाव्यवस्था यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकताच पनवेल पळस्पे ते कातळी भोगाव मार्गाचा दौरा करत पाहणी केली होती. यावेळी एसडीपीएल या रिलायन्स इन्फ्राच्या पोटठेकेदार कंपनीला वीजपुरवठा सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर शिंदे डेव्हलपर्स प्रोजेक्ट लिमिटेडचे शिवतारे यांनी महावितरणकडे पाठपुरावा करून वीज जोडणी यशस्वी केली. या दोन्ही भुयारी मार्गांमध्ये आता रात्रंदिवस एक्झॉस्ट फॅन्स आणि २०० पेक्षा अधिक पथदिव्यांद्वारे उजळलेले टनेल्स पाहायला मिळत आहेत.
भुयारी मार्ग १.८ किलोमीटर लांब असून जोड रस्त्यांसह हा मार्ग सुमारे ९ किलोमीटर आहे. यामुळे पोलादपूर ते खेड या दरम्यानचा ४५ मिनिटांचा घाटवळसा आता फक्त १५ मिनिटांत पार करता येणार आहे. उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांनी या मार्गाला चांगला प्रतिसाद दिल्याने वाहतुकीसाठीची सुविधा अधिक सक्षम करण्यात आली आहे.
तथापि, खेडकडील भुयारी मार्ग संपल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भुयाराशी जोडणी करण्यात आल्याने रात्रीच्या वेळी दोन्ही दिशांनी वाहने समोरासमोर येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच, अद्याप रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत काही ठिकाणी पथदिवे कार्यान्वित न झाल्यामुळे अपुऱ्या प्रकाशामुळे दुर्घटनेची शक्यता कायम आहे. मात्र, सद्यस्थितीत सुरू झालेला वीजपुरवठा आणि ग्राउंटींग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याने भविष्यात हा मार्ग अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.