

रत्नागिरी : राज्यातील कायदा सुव्यवस्था डबघाईला आली आहे. अन्याय, अत्याचार, बेरोजगारीला सीमा राहिलेली नाही. यावरून लक्ष वळवण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोकण प्रभारी जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आम्ही सरकारसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड रविवारी रत्नागिरी दौर्यावर होते. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, भाजपा कोणतेही काम निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच करत असते. कायम निवडणूक मूडमध्ये राहणार्या भाजपामुळे राज्यासह देशाची प्रगती खुंटली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला महाराष्ट्रातच रोखून धरले. त्यामुळे त्याची कबर आपल्या शौर्याची आणि गनिमीकाव्याची ओळख आहे. ही ओळखच भाजपला इतिहासातून पुसायची असल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. राज्यात बहुमतातील सरकार असतानाही लोककल्याणकारी काहीच होताना दिसत नाही. लाडकी बहीण योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. शेतकरी कर्जमाफीचा पत्ता नाही.
कायदा-सुव्यवस्था बिघडलेली आहे. बेरोजगारी वाढत आहे. या सर्वांकडून लक्ष वळवण्यासाठी धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. गुण्यागोविंदाने राहणार्या समाजाला बिथरवले जात असल्याचाही आरोप केला. पहलगाम नरसंहार प्रकरणी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारला आमचे समर्थन असल्याचेही शेवटी ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, बशीर मुर्तझा, निलेश भोसले, मिलिंद कीर, प्रशांत यादव आदी उपस्थित होते.