

चिपळूण : चिपळूण रेल्वे स्टेशन येथून मांडवी एक्स्प्रेसने मुंबईला निघालेल्या एका महिलेच्या पर्सची चेन उघडून त्यातील दागिन्यांचा डबी चोरट्याने लांबवली. रेल्वे गाडीत चढत असताना दि. 6 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वा. ही घटना घडली. यामध्ये सुमारे 11 लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.
अक्षता सुमित मोरे (29, रा. साईनाथ नगर विरार, मूळ रा. मु. पो. कुंबळे, ता. मंडणगड) यांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. मोरे या चिपळूणहून मुंबईकडे जाण्यासाठी मांडवी एक्स्प्रेसमध्ये चढत होत्या. त्याचवेळी खांद्याला लावलेल्या पर्सची चेन अज्ञाताने गर्दीचा फायदा घेऊन उघडली व त्यातील डबी चोरली. यामध्ये या महिलेचे 11 लाखांचे दागिने लंपास झाले.या घटनेत सव्वादोन तोळे वजनाचे तीनपदरी मंगळसूत्र, अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅम वजनाचे बटन टाईप कानातले जोड, अडीच ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याचे टॉप, साडेतीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पट्ट्या व अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ चोरट्याने लांबविली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिस अधिक तपास करीत आहेत.