

खेड : कोकणात मागील 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
खेडमध्ये रविवारी सकाळपासून जोरदार सरी कोसळत असून, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खेड तालुक्यात 100 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जगबुडी नदीपात्रात पाण्याची पातळी 5 मीटरच्या पुढे गेली आहे. प्रशासनाकडून सतत उद्घोषणा व इशारे देत नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दरम्यान, खेड-दापोली मार्गावरील दस्तुरी ते साखरोळी पुलावर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. एकवीरा नगर परिसरात सुर्वे इंजिनिअरिंगजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक चार ते पाच तास ठप्प होती.
पावसामुळे नारंगी व जगबुडी नद्या भरून वाहत असून नदीकिनार्यावरील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवतर-कोळकेवाडी रस्त्यावर झाड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याच मार्गावर रस्ता खचल्याने एक ट्रक रात्री अडकून पडला होता. या शिवाय, कुळवंडी गावाजवळील मुख्य मार्गावरही एक मोठा वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली. बांधकाम विभागाने आपत्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या सूचनेनुसार, जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे व फांद्या हटवून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान विभागाने आगामी दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.