योगेशदादांना नामदार बनवायची जबाबदारी माझी

Maharashtra assembly poll | दापोली येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; कोयनेचे पाणी कोकणात खेळवणार
Political statement on Yogesh kadam
दापोली : दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठाचे किशोर देसाई यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. pudhari photo
Published on: 
Updated on: 

दापोली : निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे. महायुतीच्या सरकारने येथील आमदार योगेश कदम यांना साडेतीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 170 हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत, असे सांगत योगेशदादाला येत्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने आमदार बनवा, मी त्यांना नामदार केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दापोली विधानसभेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचार सभेमध्ये काढले.

या सभेला माजी मंत्री रामदास कदम, खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आ. योगेश कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अण्णा कदम व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दापोलीच्या समृद्ध भूमीत योगेश कदम भगवा झेंडा घेऊन उभा आहे. योगेश कदमने दापोली मतदारसंघामध्ये रेकॉर्ड ब्रेक निधी आणला आहे. त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे. 23 तारखेला विजयी फटाके एवढे वाजवा की, त्यांचा आवाज बांद्राच्या मातोश्रीपर्यंत गेला पाहिजे. आदित्य ठाकरे सांगतात, मी रामदासभाई कदमांना काका म्हणायचो. मग त्याच काकांच्या पाठीत खंजीर खुपसून वडील मुख्यमंत्री झाले आणि पोरगा काकांचं पर्यावरणमंत्री पद हिसकावून घेत स्वतः पदावर बसला. त्यामुळे कुणी कुणावर टीका करायची, याचे भान आदित्य ठाकरे यांना नाही, अशी टीका त्यांनी केली.(Maharashtra assembly poll)

महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यात ही योजना खुपली. योजना बंद पडावी म्हणून ही मंडळी कोर्टात गेली. मात्र, विजय हा सत्याचा झाला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले. लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्र डबघाईला जाईल असे म्हणणारे आता महिन्याला 3000 रुपये सरकार आल्यास देऊ असे जाहीरनाम्यात सांगतात. महाराष्ट्रामध्ये महिलांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही त्या नराधमाला फाशी दिल्याशिवाय राहणार नसल्याचे वचनही त्यांनी यावेळी दिले.

योगेश कदमांच्या डोक्यावर बर्फ आहे. तो विरोधकांना लादीवर झोपविण्या आधीच करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही,असे सांगत थंडा मतलब कोको कोला कंपनीचा उद्योग योगेश कदम यांच्या पाठपुरामुळे कोकणात येऊ शकला. आम्ही धनुष्यबाण चोरला नाही तर तो धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवून वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो.2019 ला सुद्धा योगेश कदम हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढले होते आणि आता 2024 मध्ये सुद्धा या चिन्हावर लढत आहेत हे मतदारांनी लक्षात ठेवले पाहिजे.महायुतीच्या निशाणीवर लढणारा एकही उमेदवार पराभूत होणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.(Maharashtra assembly poll)

कदम यांच्याकडे मतदार संघाचे व्हिजन आहे.तो पुढच्या पाच वर्षात या मिनी महाबळेश्वर दापोलीला पर्यटनाच्या नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही. कोयनेचे पाणी कोकणात खेळवायचे, हे रामदासभाईंचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून, त्याला केंद्राची मान्यताही मिळाली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला 10 लाख कोटी रुपये दिले आहेत.आम्ही कोकण विकास प्राधिकारण मंडळ स्थापन केल्यामुळे कोकणचा बॅकलॉग यापुढे लवकरच भरून निघेल. कोकणचा विकासा केल्याशिवाय महायुती सरकार गप्प बसणार नसल्याचेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

किशोर देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश

यावेळी उबाठा शिवसेनेतून किशोर देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री रामदास कदम, आ. योगेश कदम आणि पदाधिकार्‍यांनी त्यांचे शिवसेनेत जोरदार स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news