

दापोली : येथील स्नेहदीप संचलित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय आणि पुणे येथील स्काय रोबोटिक्स यांच्या पुढाकाराने अद्ययावत अशी ‘ई-आय टिंकर लॅब’ (प्रयोगशाळा) उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.
ही प्रयोगशाळा उभारण्यात डॉ. मुग्धा बडे-राऊत, मोहन राऊत यांचे मोठे आर्थिक योगदान मिळाले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कर्णबधिर मुलांच्या कौशल्याचा विकास होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात दिव्यांग विद्यार्थी स्वावलंबनाच्या दृष्टीने स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजेत. विविध क्षेत्रात रोजगार व नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी राज्यातील नव्हे तर भारतातील पहिली ई-आय प्रयोगशाळा उभी करण्यात आली आहे. यावेळी स्नेहदीपच्या अध्यक्षा स्मिता सुर्वे, खजिनदार समीर गांधी, सेक्रेटरी विजयसिंह पवार, राहूल मराठे, विद्यालयाचे अध्यक्ष दीपक हर्डीकर, मुख्याध्यापक मनोहर जालगांवकर, डॉ. मुग्धा बडे-राऊत, डॉ. राऊत, केेंद्रप्रमुख सुनील कारखेले, शुभांगी गांधी, कोपरकर, धर्माधिकारी आदी उपस्थित होते. समाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक झाला पाहिजे. या प्रयोगशाळेचा वापर कर्णबधिर विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार आहे. या विद्यालयाचा प्रगतीचा आलेख उंचावत आहे. येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून ते स्व-कर्तृत्वावर उभे राहिले आहेत. या प्रयोगशाळेचा लाभ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शिक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा, असेही सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली गरज ओळखून या शाळेला ई-आय टिंकर लॅब उभी करण्यात पुणे येथील स्काय रोबोटिक्स संस्थेेचे सेवाभावी डायरेक्टर अभिजित सहस्त्रबुद्धे, अभ्यासू अध्यापक कृष्णमूर्ती यांनी कष्ट घेतले. आज समाजात संवेदनशिलतेचा तुटवडा आहे. असे असताना खरोखरच या दिव्यांग मुलांची संवेदनशिलता ध्यानात घेऊन येथील स्नेहदीप संचलित शिक्षण संस्थेची गरज लक्षात घेऊन स्नेहदीप दापोली संचलित इंदिराबाई वामन बडे मूकबधिर विद्यालय व पुणे स्काय रोबोटिक्स या संस्थेने पुढाकार घेऊन अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करून देऊन आदर्श घालून दिला आहे.