Rajkot Fort : छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण
प्रमोद म्हाडगुत
मालवण : राजकोट किल्ला येथे रविवारी योद्धाधारी रूपातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्याचे औपचारीक लोकार्पण केले. यावेळी चबुतर्यासह राजकोट किल्ल्यावरील फुलांची सजावट लक्षवेधी होती. अथांग सागरी किनार्याच्या पार्श्वभूमीवर उभारलेला हा सुमारे 93 फूट उंच शिवपुतळा आता सर्वसामान्य जनतेला दर्शनासाठी खुला झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्व. बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, माजी मंत्री आ. रवींद्र चव्हाण, आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे, आ. रवींद्र फाटक, आ. निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत शिवआरती झाली. सर्व मान्यवरांनी पुतळा परिसराची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवपुतळ्याची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कणकवली येथील महानंद चव्हाण यांनी ‘तुतारी’ वाजवून मान्यवरांचे स्वागत केले. पूजेदरम्यान विविध रंगांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, कोकण विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण दराडे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, सा. बां. चे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, मालवण तहसीलदार वर्ष झाल्टे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माजी आ. अजित गोगटे आदी उपस्थित होते.
4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या राजकोट किल्ल्यावर मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता. त्या निमित्त या राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होते. परंतु, हा पुतळा सोमवार 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी कोसळला. या घटनेवर सर्वच स्तरातून टीका झाली.तेव्हा हा पुतळा पुन्हा नव्याने अधिक दिमाखदारपणे उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 25 सप्टेंबर 2024 रोजी शिवपुतळ्याच्या कामाचा शुभारंभ झाला आणि रविवार 11 मे रोजी हा शिवपुतळा सर्वांसाठी खुला झाला.

