

खेड : देशभरात आज हनुमान जयंती उत्सव भक्तिभावाने साजरा होत आहे. अनेक गावांमध्ये मारुतीची अनेक रूपे पाहायला मिळतात. असेच मारूतीचे वेगळे रूप कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये (Maruti Mandir Khed) पाहायला मिळते. या मारुतीचे नाव आहे राष्ट्रीय मारुती. स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेल्या या हनुमंताचे दर्शन घेणे म्हणजे शक्ती आणि देशभक्ती यांचा आशीर्वाद मिळविण्यासारखे आहे. (Hanuman Jayanti 2025)
खेड बाजारपेठेत मध्यभागी उभ्या असलेल्या पिंपळाच्या पारावर असलेल्या मारुतीच्या मंदिराचे वैशिष्ठ्यपूर्ण नाव आहे. या मंदिरातील मारुतीचे नाव चक्क राष्ट्रीय मारुती असे आहे. या मागील आख्यायिका अशी आहे की, स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांच्या विरोधात लढा देताना याच पारावर मारुतीच्या साक्षीने खलबत झाली. त्यामुळे या मारुतीचे नाव राष्ट्रीय मारुती असे ठेवण्यात आले. त्यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या राष्ट्रीय मारुतीने देशाचे राष्ट्रीयत्वाला बळ दिले आहे.
खेड शहर हे कोकणातील एक ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. या तालुक्यातील अनेकांचा स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग आहे. तालुक्यातील आयनी येथे मूळ गाव असलेले अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला याच खेड तालुक्यातील शिवतर गावातील अनेकांनी आझाद हिंद सेनेत देखील दाखल होऊन सेवा केल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. त्यामुळेच कदाचित खेडमध्ये हनुमंताने राष्ट्रीय मारुतीचे रूप धारण केले आहे.
खेडमध्ये राष्ट्रीय मारुती मंदिर ज्या पारावर आहे. त्याच ठिकाणी एक पुरातन पिंपळ वृक्ष आहे. शेकडो वर्षांपूर्वी पासून या पाराचे आणि मारुती मंदिराचे अस्तित्व आहे. ज्येष्ठ नागरिक सांगतात ब्रिटिश काळात मंदिर छोटे होते. एक दोन माणसेच गाभाऱ्यात थांबू शकत. पण खेडमधील सर्वच प्रकारच्या राजकीय, सांस्कृतिक घडामोडीचा हा पार व मंदिर साक्षीदार आहेत. ब्रिटिशांचे नागरिकांवर बारीक लक्ष असायचे. त्यामुळे स्वतंत्र लढ्यातील काही गुप्त संदेश या मंदिरातून पोहोचवले जात, असे ज्येष्ठ लोक सांगतात, अशी माहिती येथील रहिवासी प्रशांत सोहनी यांनी दिली.