

चिपळूण : मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात मुंबईकडे जाणार्या कारवर वीज प्रकल्पाच्या राखेची वाहतूक करणारा कंटेनर आदळल्याने मुंबई-अंधेरीतील चारजण जागीच ठार झाले. यात चिपळूण तालुक्यातील तोंडली पिलवली येथील मूळचे रहिवासी असलेल्या एक भाऊ व दोन बहिणींचा जागीच मृत्यू झाला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरुडेश्वर येथील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रम येथे दर्शन आटोपून घरी परतताना ही दुर्घटना घडली.
अंधेरी येथून गुरुवारी सकाळी गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी मुंबई येथील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमात मुंबई येथून शेकडो गुरुबंधू आले होते. त्यातील एकाच कुटुंबातील तीन भाविक आणि चालक असे चारजण कारमधून अंधेरी येथे जाण्यासाठी निघाले. त्यांची कार महामार्गावर येताच काही मिनिटांत कारला टँकरने धडक दिली. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी नित्यानंद सावंत (62), विद्या सावंत (65), वीणा सावंत (68, अंधेरी मुंबई, मूळचे सावर्डे चिपळूण) तसेच चालक दत्तात्रेय अंब्राले (रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत सावंत भाऊ बहीण हे तिघेही अविवाहित होते. नित्यानंद सावंत हे मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी होते. विद्या सावंत महानगर टेलिफोन निगमच्या सेवानिवृत्त कर्मचारी होत्या.
नाशिकमध्ये गरुडेश्वर येथील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रम येथे दर्शन आटोपून सावंत कुटुंबीय दुपारी 1 वाण्याच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी निघाले असताना हा अपघात झाला.