Ratnagiri : खेड, मंडणगडमध्ये पावसाचा कहर

पूरस्थिती गंभीर; नारिंगी, जगबुडी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
Ratnagiri Rain News
खेड, मंडणगडमध्ये पावसाचा कहर
Published on
Updated on

खेड, मंडणगड : जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून, खेड तालुक्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नारिंगी आणि जगबुडी या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, खेड शहरात पूरपरिस्थितीने थैमान घातले आहे. तसेच मंडणगड तालुक्यात गुरुवारी (19 जून) सकाळपासून मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जीवनमानावर झाला. पावसामुळे मंडणगड - दापोली राज्यमार्गावरील केळवत घाटात मोठे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, तर आंबडवे- राजेवाडी राष्ट्रीय मार्गावरील तुळशी घाटात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पातळी 10 मीटरवर पोहोचली असून, दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंग परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच देवणे भागात पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे खाडीमार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

वाडीमालदेत दरडी कोसळल्या

खेड तालुक्यातील वाडीमालदे गावाजवळ सुमारगडाच्या पायथ्याशी दरड कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. नांदिवलीहून खेडकडे येणारी एसटी बस सकाळी 6 वाजता दरड कोसळल्यामुळे काही काळ अडकून पडली होती. मात्र, गावकर्‍यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत दरड हटवण्याचे काम सुरू केले. अवघ्या काही तासांत त्यांनी रस्ता मोकळा करून वाहतूक पूर्ववत केली. या श्रमदानात पोलिसपाटील भार्गव तुकाराम चव्हाण, दिनेश रावजी चव्हाण आणि शाहू रावजी चव्हाण यांचे विशेष योगदान होते.

मंडणगडात वाहनचालकांची कसरत

याचबरोबर मंडणगड शहरानजीक भिंगळोली येथील विश्रामगृहानजीक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली.

केळवत व तुळशी घाटांतील वाहतूक पूर्ववत

मंडणगड तालुक्यातील केळवत व तुळशी या प्रमुख मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी आपत्कालीन विभागाने कार्यवाही करत झाड, दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. दरड बाजूला करण्यासाठी आपत्कालीन महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण यांनी परिश्रम घेतले. तालुक्यात दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी केले असून भारजा, निवळी नद्या दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकिनार्‍यावरील भागात पूरसद़ृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या असून, त्यांचे पंचनामे सुरू आहेत. तालुक्यातील शाळांना गुरुवारी सकाळी शाळा भरल्यानंतर लगेचच सुट्टी देण्यात आली.

विजेचा खेळखंडोबा

पावसाच्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे, तो अद्याप अविरत आहे. त्यामुळे महावितरणच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक महावितरणाच्या या नियमित सुरू असलेल्या कामकाजासंदर्भात नाराजी व्यक्त करत आहेत. मागील चौवीस तासात 95 मि.मी., तर आतापर्यंत तालुक्यात 585 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

भातशेती पाण्याखाली

भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. बहिरवली खाडीपट्ट्यातील सुमारे चाळीस गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नदीकिनार्‍यावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना अनावश्यकपणे पाण्यात न उतरता सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खेड बाजारपेठेत व्यापार्‍यांमध्ये धावपळ सुरू असून, आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news