Ratnagiri Rain : जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

रत्नागिरी तालुक्यात संरक्षक भिंत कोसळून तीन जखमी
Ratnagiri rain news
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
Published on
Updated on

रत्नागिरी : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात रेड अलर्ट असून, जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी शहरालगत पोमेंडी खुर्द गावात राहणार्‍या कामगारांच्या तीन झोपड्यांवर संरक्षक भिंत कोसळल्याने या झोपड्या जमीनदोस्त झाल्या. या घटनेत तीनजण जखमी झाले असून, यात एका बालकाचा समावेश आहे. जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट असून अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मागील तीन-चार दिवस जोरदार वार्‍यासह सतत कोसळणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. रत्नागिरी शहरालगत असणार्‍या पोमेंडी खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये गुुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झोपड्यांवर संरक्षक भिंत कोसळली. यात आशा अमर राठोड (वय 42), मोहन किसन राठोड (2) आणि रोहन जाधव (17) हे तिघेजण जखमी झाले. स्थानिकांनी जखमींना मलब्या खालून बाहेर काढले. यानंतर लोकांनी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चव्हाण व तलाठी वैभव शेंडे यांना याची कल्पना दिली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

संगमेश्वर तालुक्यात पांगरी येथील अंगणवाडीचे पत्रे उडाल्याने अंगणवाडीत पाणी गेले. कसबा येथे अब्दुल कादीर इस्माईल दळवी यांच्या घराजवळ संरक्षक भिंत कोसळून 50 हजारांचे नुकसान झाले. अर्धवर राहिलेली संरक्षक भिंतीचा येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. संगमेश्वर रामपेठ येथे हायवेवर साचलेले पाणी सचिन शेट्ये यांच्या घरात घुसून सुमारे 1 लाख 38 हजारांचे नुकसान झाले. पुर्ये तर्फे देवळे जांभवाडी येथे सोना गोरुळे व मंगेश गोरुळे यांची संरक्षक भिंत कोसळून एक हजाराचे नुकसान झाले. गुहागर तालुक्यात तळवळी येथे घरावर वीज पडल्याने गणेश विठ्ठल भोळे यांचे सुमारे दोन लाखाहून अधिक तर त्यांचे भाऊ अनंत विठ्ठल भोळे यांचे तीन लाखाहून अधिकचे नुकसान झाले. पार्वती बेंद्र यांच्या घराजवळील सार्वजनिक विहीरीचा कठडा कोसळून साठ हजाराचे नुकसान झाले.

चिपळूण तालुक्यातील देवपाट टेकडेवाडी येथे पांडूरंग दुर्गुळे, दीपक दुर्गुळे यांच्या घरावर आंबा कलमाचे झाड पडून दीड लाखांचे नुकसान झाले. कामथे येथे बाबू जाधव यांच्या शौचालयावर झाड पडून दहा हजाराचे नुकसान झाले. दापोली तालुक्यातील मुरुड येथे अर्चना गुरव यांच्या घराच्या शेडचे पावसामुळे नुकसान झाले. बुरुंडी येथील सबाब बुरुंडकर यांच्या घरावर झाड कोसळून 36,650 रुपयांचे तर लईका बुरुंडकर यांच्या घरावर झाड पडून पाच हजाराचे नुकसान झाले. करंजगाव येथे महादेव तांबोळी यांच्या गोठा कोसळून 95 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले. दापोली कॅम्प येथे अब्दुल मुकादम यांच्या घराचे 1 लाख 80 हजाराचे नुकसान झाले. ओणणवसे येथे भारत खोत यांच्या घरावर माड कोसळून 14 हजाराचे नुकसान झाले आहे. मागील चोवीस तासात पावसाने अनेक ठिकाणी वीज खांब पडल्याच्याही घटना घडल्या असून, अनेक भागात वीज प्रवाह खंडित झाला होता. महावितरण कर्मचार्‍यांनी हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले आहे.

जिल्ह्यात मागील 24 तासात मंडणगड 27.75 मि.मी., खेड 94.28 मि.मी., दापोली 105.71 मि.मी., चिपळूण 99.22 मि.मी., गुहागर 190.40 मि.मी., संगमेश्वर 116.45 मि.मी., रत्नागिरी 124.11 मि.मी., लांजा 128 मि.मी., राजापूर 50 मि.मी., अशी जिल्ह्यात 935.92 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आणखी चार दिवस अशीच स्थिती राहणार

जिल्ह्यात संततधार सुरूच असून आणखी तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. जिल्ह्यात पुढील चार दिवस 45 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून समुद्र अतिखवळलेला राहणार आहे. मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये जे मच्छीमार गेले असतील त्यांनी तातडीने परतावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news