

रत्नागिरी : मध्य भारतात निर्माण होणार्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणासह राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील 24 तासांत पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले असून खेडची जगबुडी नदी धोका पातळीवर तर संगमेश्वरची शास्त्री आणि राजापूरची कोदवली नदी इशारा पातळीवर वाहत आहे. अन्य नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या पावसामुळे माखजन बाजारपेठेत पाणी भरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोपडून काढले आहे. मागील तीन-चार दिवस सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यात पावस जोरदार कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील जलजीवन विस्कळीत झाले आहे. खेड-दापोली मार्गावर सातत्याने पाणी येत असल्याने, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेतही सलग दोन दिवस पाणी घुसल्याने व्यापार्यांसह ग्रामस्थांचे नुकसान झाले. चिपळूण बाजारपेठेमध्येही रविवारी पाणी घुसले होते. नागरिकांना सातत्याने सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत होत्या. मोठ्याप्रमाणात पडणार्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे. नदया नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागामध्येही डोंगराळ भागात रस्त्यांवर माती येण्याचे प्रकार घडत असून, स्थानिक ग्रामपंचायत व बांधकाम विभागाकडून रस्ते मोकळे केले जात आहेत. सखल भागात नद्यानाल्यांचे पाणी घुसण्याची शक्यताही प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जगबुड नदी धोका पातळीच्यावरुन वाहत आहे तर? ? शास्त्री आणि कोदवली नदी इशारा पातळीच्यावरुन वाहत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनासह एनडीआरएफलाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात मंडणगडसह खेड, चिपळूण, लांजा, संगमेश्वर आदी सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत आहे. जिल्ह्यात मागील चौवीस तासात मंडणगड 124, खेड 170, दापोली 154, चिपळूण 147.11, गुहागर 113, संगमेश्वर 163.33, रत्नागिरी 119.55, लांजा 116.66 तर राजापूर 99.62 असा एकूण 1207 मिमी पावसाची नोंद झाली आहे.