

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर कायम असून दिवसभर पावसाने उसंत घेतली नाही. जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. समुद्र खवळलेला असून उंच लाटा उसळत आहेत. बुधवारी रात्रीपासून अमावस्या असल्याने या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. शेतीच्या कामांनाही वेग आला असून लावणी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. पुढील चार दिवस हवामान खात्याने किनार्यासह दुर्गम भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात 464.35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 46.50 मि.मी., खेड 51.42 मि.मी., दापोली 54 मि.मी., चिपळूण 50 मि.मी., गुहागर 76 मि.मी., संगमेश्वर 36 मि.मी., रत्नागिरी 49.33 मि.मी., लांजा 43.60मि.मी. व राजापूर 57.50 मि.मी.
समुद्र खवळलेला असून, उंच लाटा उसळत आहेत. बुधवारी रात्री अमावस्या असल्याने या कालावधीत समुद्राला मोठी भरती येत असल्याने आणखी उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनार्यावर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.