

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गस्तीदरम्यान देवरूख-साखरपा हद्दीमध्ये साखरपा ते पाली मार्गावर तब्बल 21 लाख 40 हजार 160 रुपयांचा पान मसाला व सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा)आणि 7 लाखांचे पिकअप वाहन असा एकूण 28 लाख 40 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई बुधवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास करण्यात आली.
विकास गंगाराम पडळकर (वय 28, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, सांगली), तेजस विश्वास कांबळे (23, रा. मिरज, सांगली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे एक पथक बुधवारी सकाळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, देवरूख-साखरपा हद्दीमध्ये साखरपा ते पाली या मार्गावर गस्त घालत होते.
त्यावेळी त्यांना एकजण त्याच्या ताब्यातील वाहनासह याहू ढाब्याच्या समोर संशयित हालचाली करत असताना दिसून आला. या पथकाला त्याच वाहनात बसलेल्या दुसर्या एकाचा संशय आल्याने या पथकाने त्यांच्या पिकअप गाडीची (एमएच-10-सीआर-8366) झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला व गुटखा मिळून आला. हा माल संगमेश्वर येथे वितरणासाठी नेला जात होता. दोन्ही संशयितांविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ओगले, पोलीस हवालदार झोरे, डोमणे, पालकर, कदम, खांबे, सवाईराम, दरेकर, सावंत व चालक कान्स्टेबल कांबळे यांनी केली.