

गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या गुहागर वैकुंठभूमीचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. कामात दिरंगाई करणार्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान या कामाची पाहणी शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकार्यांनी करून प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
गुहागर नगरपंचायतीने 14 वा वित्त आयोगातून सन 2023 मध्ये मंजूर झालेले गुहागरच्या वैकुंठ भूमिचे काम अजून सुरू आहे. निर्मिती इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या नावाने कामाचे टेंडर घेतले गेले आहे. मात्र प्रत्यक्षात सागर पवार हे ठेकेदार सब ठेकेदार म्हणून करत आहेत.ज्या ठेकेदारांना वैकुंठभूमीचे काम दिले आहे त्यांनी केलेल्या कामाचे सिलिंगचे प्लास्टर न करताच स्लॅबचे खड्डे हाताने भरून कलर देऊन काम पूर्ण झाल्याचे दाखविले आहे. तर उर्वरीत पुढील कामाचे अजूनही स्लॅब लेवलला काम सुरू आहे. तर याच ठेकेदाराकडे असलेल्या शोकसभागृहाचेही केवळ स्लॅब टाकून अर्धवट काम करून ठेवले आहे.
या कामाव्यक्तीरिक्त लाकडे अंत्यविधीसाठी पुरविण्याचे काम नगरपंचायत करते. सदर लाकडे पावसात भिजू नयेत म्हणून तब्बल 8 लाख रूपये खर्व करुन लाकूड शेड नगरपंचायत उभारत आहे. या लाकूड शेडच्या उभारणीचा ठेका नितीश तांबे या ठेकेदाराने घेतला आहे. मे महिन्यामध्ये केवळ जोते घालून हे कामही ठेकेदाराने अर्धवट ठेवले होते. मात्र, नंतर ठेकेदाराने नगरपंचायतीमध्ये हजर होऊन 7 जून 2025 च्या आत काम पूर्ण करतो, असे आश्वासन नगरपंचायत व ग्रामस्थांना दिले होते. त्यानंतर आतापर्यंत केवळ भिंती उभारल्या असून छप्परचे काम गेले महिनाभर पुन्हा रखडले आहे.? ? ठेकेदाराच्या या मनमानी कारभारामुळे शहरातील शिवसेना उबाठाचे शहराध्यक्ष सिद्धीविनायक जाधव यांनी सदर प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेना उबाठाचे सर्व शहरातील पदाधिकारी यांनी वैकुंठभूमीला भेट देत कामाची पाहाणी करत निकृष्ट कामावर आक्रमक पावित्रा घेतला. प्रसंगी आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आता यावर कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.