

रामपूर : गुहागर एसटी आगारातील विविध समस्या आणि मनुष्यबळाची कमतरता तातडीने दूर करून प्रवाशांना दर्जेदार व सुरळीत वाहतूक सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस, ज्येष्ठ पत्रकार तथा कोकण विकास ग्रामीण प्रवासी महासंघाचे कार्याध्यक्ष अनिल कुमार जोशी यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांकडे ऑनलाईन निवेदनाद्वारे केली आहे.
गुहागर आगाराचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत कमकुवत झाला असून आगारातील महत्त्वाची अधिकारी पदे रिक्त आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून गुहागर आगारात कायमस्वरूपी डेपो मॅनेजर तसेच इतर आवश्यक अधिकार्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे आगाराच्या दैनंदिन व्यवस्थापनावर परिणाम होत असून रत्नागिरी विभागाच्या वाहतूक नियंत्रक कार्यालयाकडून या समस्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे.
गुहागर आगारासाठी १५ नवीन एस.टी बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. आगारासाठी एकूण ६५ बसेस मंजूर असताना प्रत्यक्षात बस उपलब्धतेअभावी केवळ सुमारे ५९ बसेस चालवाव्या लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी स्थानिक वस्तीच्या अनेक फेर्या रद्द कराव्या लागतात आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
आगारातील काही बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. दोन बसेस रस्त्यावर ब्रेकडाऊन होण्याच्या घटना घडतात तर चार शिवशाही बसेस जुन्या झाल्याने त्यांच्यातही वारंवार बिघाड होतो. शिवशाही बसचे भाडे तुलनेने जास्त असतानाही प्रवासादरम्यान बस बंद पडल्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत असल्याचे जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
गुहागर आगारात चालक आणि वाहकांचीही मोठी कमतरता आहे. उपलब्ध मनुष्यबळ अपुरे असल्याने सुमारे ७० टक्के चालक-वाहकांना डबल ड्युटी करावी लागत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सलग अतिरिक्त ड्युटीमुळे चालक व वाहकांना वेळेवर जेवण घेण्याचीही संधी मिळत नसून काही कर्मचार्यांना उपाशीपोटी डबल ड्युटी करावी लागत असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. ही परिस्थिती कर्मचारी आणि प्रवासी दोघांच्याही दृष्टीने गंभीर असून चालक-वाहकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक तेवढ्या चालक-वाहकांची तातडीने भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गुहागर आगाराच्या यांत्रिकी विभागातही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बसेसची संख्या आणि त्यांच्या देखभालीचा विचार करता यांत्रिकी विभागात आवश्यक संख्येने मेकॅनिक उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बसेसच्या देखभालीअभावी रस्त्यावर बिघाड होण्याचे प्रमाण वाढू नये, यासाठी यांत्रिकी विभाग सक्षम करणे गरजेचे आहे.
गुहागर आगारातील सर्व कमतरता दूर करून प्रवाशांना नियमित, सुरक्षित आणि वेळेवर एसटी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. रिक्त पदे भरून नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यास गुहागर आगाराचा कारभार सुधारण्यास मोठी मदत होईल आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळेल, असेही जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.