Guhagar Municipal Council Election Result 2025 | गुहागर नगरपंचायतीवर महायुतीची सत्ता
गुहागर: नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी भाजप शिवसेना युतीच्या सौ. निता मालप (2135 मते) निवडून आल्या. युतीचे 13 नगरसेवक विजयी झाले. मनसेचा व राष्ट्रवादीचा प्रत्येकी उमेदवार विजयी झाला तर शिवसेना उबाठाचे 2 नगरसेवक विजयी झाले. तीन प्रभागातील उमेदवार 4 ते 6 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.
गुहागर नगरपंचायतीची निवडणुकीत युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. निता मालप (2135 मते) 997 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ. सुजाता बागकर (1138) यांचा पराभव केला. येथे शिवसेना उबाठाच्या पारिजात कांबळे यांनी 1105 मते मिळविली. तर अपक्ष उमेदवार सुप्रिया वाघधरे यांनी 79 मते मिळविली. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर नगर पंचायतीमध्ये भाजप सेना युतीचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपचे 6, शिवसेनेचे 7 नगरसेवक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस 1, मनसे 1 आणि शिवसेना उबाठा 2 नगरसेवक निवडून आले आहेत.
प्रभाग १ मध्ये शिवसेना उबाठाचे बागकर समीर यशवंत (142 मते) यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर (113 मते) यांचा पराभव केला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिपक शिरधनकर यांना 131 मते मिळाली या प्रभागात राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता बागकर यांना 231 मते मिळाली आहेत.
प्रभाग 2 मध्ये भाजपचे उमेश भोसले (219) एकतर्फी निवडून आले. येथे माजी सरपंच सतिश शेटे (शिवसेना उबाठा) यांना केवळ 99 मते मिळाली.
प्रभाग 3 मध्ये शिवसेनेच्या स्वरा तेलगडे (186 मते) यांनी शिवसेना उबाठाच्या रिध्दी घोरपडे(102 मते) यांचा पराभव केला.
प्रभाग 4 मध्ये मनसेच्या कोमल दर्शन जांगळी विजयी झाल्या. त्यामुळे प्रथमच गुहागर शहराच्या राजकारणात मनसेने विजय मिळवून आपले अस्तित्व सिध्द केले आहे. येथे भाजपच्या स्मिता जांगळी (114) व अपक्ष नेहा सांगळे (54) यांचा पराभव झाला.
प्रभाग 5 मधुन भाजपच्या सौ वैशाली मावळंकर बिनविरोध विजयी झाल्या.
प्रभाग 6 मध्ये भाजपच्या सौ. अनुषा भावे (177 मते) यांनी शिवसेना उबाठाच्या सौ. रिध्दी रहाटे (22 मते) एकतर्फी पराभव केला.
प्रभाग 7 मध्ये शिवसेनेच्या विदिशा दणदणे (104 मते) यांचा अवघ्या 6 मतांनी विजय झाला. या प्रभागातील शिवसेना उबाठाच्या सौ. प्रगती वराडकर यांना 98 मते मिळाली. प्रचारादरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी या प्रभागातील एका शासकीय कर्मचाऱ्याची तातडीने बदली केली. त्याचा फटका त्यांच्या उमेदवाराला बसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
प्रभाग 8 मध्ये भाजपच्या सुषमा रहाटे (118 मते) अवघ्या 5 मतांच्या फरकाने विजयी झाल्या. शिवसेना उबाठाच्या सौ. रिया गुहागरकर यांना 113 मते मिळाली.
प्रभाग 9 मध्ये भाजपच्या सौ. मिरा घाडे (134 मते) यांनी राष्ट्रवादीच्या शितल कदम (99) व सौ. वैशाली मालप (91) यांचा पराभव केला.
प्रभाग 10 मध्ये शिवसेनेचे प्रदिप बेंडल (154) यांनी शिवसेना उबाठाचे राजेंद्र आरेकर (63 मते) यांचा दणदणीत पराभव केला.
प्रभाग 11 मध्ये शिवसेना उबाठाचे सक्रीय कार्यकर्ते प्रविण रहाटे (26 मते) यांनाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे सुचित साटले (201 मते) यांनी 175 मतांनी विजय मिळविला.
प्रभाग क्र. 12 मध्ये भाजपच्या सौ. विशाखा सोमण यांनी राष्ट्रवादीच्या सौ. अन्विता मांडवकर (62) व शिवसेना उबाठाच्या निता गुरव (13) यांचा पराभव केला.
प्रभाग 13 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र भागडे (177) यांनी शिवसेना उबाठाचे सुजल होळंब (19 मते) यांचा 158 मतांनी पराभव केला.
प्रभाग 14 मध्ये प्रभाग 13 मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार राजेंद्र भागडे यांचे पुत्र सौरभ भागडे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांनी भाजप सेना युतीचे संजय मालप (112) यांचा पराभव केला. भाजप सेना युतीच्या नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेल्या उमेदवार सौ. निता मालपही याच प्रभागात रहातात. त्यांना या प्रभागात 157 मते मिळाली. मात्र सुरवातीपासुनच या प्रभागातील युतीचा उमेदवार धोक्यात होता. विशेष म्हणजे या प्रभागातील शिवसेना उबाठाच्या उमेदवार संगिता वराडकर यांना केवळ 1 मत मिळाले आहे.
प्रभाग 15 मधील शिवसेनेचे संदेश उदेक (223 मते) यांनी शिवसेना उबाठाचे अनिकेत जाधव (14) सर्वाधिक 209 मताधिक्य घेत पराभव केला. सर्व प्रभागांमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा मान संदेश उदेक यांनी मिळवला आहे.
प्रभाग 16 मधील निवडणूक सुरवातीपासुनच चुरशीची ठरली होती. युतीच्या उमेदवारासमोर शिवसेना उबाठाचे राज विखारे यांनी आव्हान उभे केले होते. त्यातच मनिष गोयथळे अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्याने अमोल गोयथळे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र हे आव्हान अमोल गोयथळे यांनी यशस्वीरित्या परतवून लावले आहे. येथे शिवसेनेचे अमोल गोयथळे (169) अवघ्या 4 मतांनी निवडून आले. या प्रभागात शिवसेना उबाठाचे राज विखारे यांनी 165 मते मिळविली. तर अपक्ष उमेदवार मनिष गोयथळे यांनी 24 मते मिळविली.
प्रभाग 17 मधील निवडणुक सुरवातीपासुनच भाजप सेना युतीसाठी अवघड होती. येथे खरी लढत राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना उबाठा अशीच होती. या लढतीमध्ये शिवसेना उबाठाच्या श्रीया मोरे (151) यांनी राष्ट्रवादीच्या समिक्षा आरेकर (122) व शिवसेनेच्या सिध्दी आरेकर (17) यांचा पराभव केला.
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर नगर पंचायतीमध्ये भाजप सेना युतीचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपचे 6, शिवसेनेचे 7 नगरसेवक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस 1, मनसे 1 आणि शिवसेना उबाठा 2 नगरसेवक निवडून आले आहेत.

