

गुहागर : गुहागर समुद्रकिनारी संरक्षित करण्यात आलेल्या अंड्ड्यांमधून 33 कासव पिल्लांचा जन्म झाला असून या नवजात कासव पिल्लांना सोडले असता ती समुद्राकडे झेपावली आहेत. या मोसमामध्ये आतापर्यंत 23 घरट्यांमधून 2524 कासव अंड्ड्यांना संरक्षण देण्यात आले आहे.
गुहागर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या जातीचे मादी कासव अंडी घालण्यासाठी हजेरी लावत आहेत. पाऊस थांबल्यानंतर कासव विणींचा हंगाम सुरू झाला असून 17 नोव्हेंबर 2025 रोजी गुहागर समुद्रकिनारी 128 अंड्यांचे पहिले घरटे मिळून आले होते. यासाठी समुद्रकिनारी 6 कासव अंडी उबवणूक केंद्रे उभारण्यात आली असून कासव संवर्धनासाठी 11 कासव मित्रांची नेमणूक केली आहे. ही अंडी तीन नंबरच्या कासव उबवणी केंद्रामध्ये संरक्षित करण्यात आली होती. या अंड्यांमधून 33 कासव पिल्लांचा जन्म बुधवारी झाला आहे.
दक्षिण कोकण कांदळवन विभागीय वनाधिकारी कांचन पवार, रत्नागिरी कांदळवन वनपरीक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, गुहागरचे वनपाल अमित निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, कासवमित्र संजय भोसले व त्यांची 11 कासवमित्रांची टीम कासव संवर्धनाचे काम करत आहे. बुधवारी जन्मलेल्या 33 ऑलिव्हरिडले कासवपिल्लांना सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया पार पडली. नवजात कासव पिल्ले समुद्रामध्ये सोडताना वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता मंदार छत्रे, कासवमित्र संजय भोसले, शार्दुल तोडणकर, साहिल तोडणकर उपस्थित होते. गुहागर समुद्रकिनारी यावर्षीही मोठ्या प्रमाणात कासव अंड्यांचे संरक्षण केले जात आहे.