

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील पाणी टंचाईसंदर्भात गुरुवारी आयाजित आढावा बैठकीत केल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी सुरुवातीला संगणकीय सादरीकरणाद्वारे पाणी टंचाई अंतर्गत वर्षनिहाय लागलेले टँकर, टंचाई निवारणार्थ राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना, संभाव्य पाणी टंचाई मधील प्रस्तावित कामे आदीबाबतची माहिती दिली. पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील ज्ाी गावे, वाड्यांमध्ये पाण्याची कमतरता असेल त्याठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करा. ज्या नळपाणी योजनांची कामे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करा. त्याबाबत नियमित आढावा घ्या. पाणी टंचाई आराखड्यातून विंधन विहिरींची कामे सुरु आहेत, त्याचबरोबर आवश्यकतुेनसार जिल्हा नियोजन निधीमधूनही विंधन विहिरींसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. पुढील वर्षापासून पाणी टंचाई आराखड्याला डिसेंबरमध्ये मंजुरी देऊन पाणी टंचाई आराखड्यामधील कामे जानेवारीमध्येच सुरु करा. पाणी टंचाई विचार करताना कमी पाऊस पडला किंवा उशिरा पाऊस सुरु झाला तर त्यावर नियोजन ठेवा. टँकर आणि विंधन विहीर धारकांना शासकीय दर आणि बाजारभावानुसार दर यामधील फरक देण्यासाठी निधी उपलब्धता करण्यात येईल. टँकरवाल्यांची देयक प्रलंबित ठेवू नका, ती तात्काळ अदा करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यात बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकांच्या कामाचा आढावा घेतला. ज्या बसस्थानकांची कामे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करा. चांगल्या दर्जाचे काम करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. बस डेपोमधील उपलब्ध बस, वस्तीच्या गाड्यांचे वाहक, चालकांची राहण्याची व्यवस्था, बस स्थानकातील स्वच्छता, लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे थांबे बाबतही यावेळी पालकमंत्री आढावा घेतला. यावेळी त्यांनी देवरुख येथील बस डेपोमधील अडीअडचणी जाणून घेतल्या. देवरुख बस डेपोला लवकरच भेट देऊन तेथील पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तद्नंतर पालकमंत्री डा सामंत यांनी मालगुंड येथे होणाऱ्या प्राणी संग्रहालयाबाबतही आढावा घेतला.