

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तोंडळी-मोडीतर-शिवणे येथील कापशी नदीवरील पुलाच्या उभारणीच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीपाठोपाठ सर्वसाधारण सभेतही या पुलाच्या उभारणीसाठी शासनाकडे शिफारस करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित पुलाच्या उभारणीला महत्त्वपूर्ण बळ मिळाले आहे.
जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समिती सदस्या शिवानी सावंत यांनी या पुलाची गरज लक्षात घेऊन उभारणीसाठी सतत पाठपुरावा केला. या अनुषंगाने संबंधित ठिकाणाची पाहणी व सर्वेक्षण करून पुलाची उपयुक्तता तपासण्यात आली. त्यानंतर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा या दोन्ही सभाृहांत शासनाकडे शिफारस करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शासनस्तरावर मंजुरी आणि आवश्यक निधीसाठी पाठपुरावा होत असून, त्यांच्या पुढाकारांमुळे या बहुप्रतीक्षित पुलाच्या उभारणीला गती मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. चिपळूण तालुक्यातील तोंडळी-मोडीतर आणि गुहागर तालुक्यातील शिवणे या गावांदरम्यान कापशी नदीवर पूल उभारल्यास परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
या पुलामुळे गुहागर, संगमेश्वर आणि रत्नागिरी या भागांचा चिपळूणशी संपर्क अधिक सोयीचा होऊन चार तालुकेसह ४५ गावांच्या दळणवळणाला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास, रुग्णांची ये-जा आणि शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांच्या वेळेची व श्रमांची बचत होणार आहे.
तसेच या पुलामुळे परिसरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सोयीचे होऊन पर्यटनविकासालाही नवी संधी मिळेल. पर्यटकांची वर्दळ वाढल्यास स्थानिक हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री, वाहतूक आणि अन्य पूरक व्यवसायांना चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
त्यामुळे हा पूल केवळ दोन भागांना जोडणारा दुवा न ठरता ग्रामीण विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा महत्वपूर्ण प्रकल्प ठरेल. जिल्हा परिषदेच्या दोन्ही सभाृहांत मंजूर झालेल्या ठरावळामुळे पुलाच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.