

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात माळरानावरील सुकलेल्या गवताला वणवा लागण्याच्या घटना वाढत आहेत. सोमवारी एका दिवसात खरवते, कसोप, पेठकिल्ला येथील शिवसृष्टीजवळ गवताला लागलेला वणवा रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने विझवला. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेतील
मच्छिमार्केटच्या गच्चीवर उगवलेल्या गवताला लागलेली आगही अग्निशामक दलाने विझवली. खरवते येथे सकाळी तर संध्याकाळी कसोप येथील नंदाई नगरात गवताला आग लागली होती. त्याचबरोबर रात्री पेठकिल्ला येथील शिवसृष्टीजवळच्या गवताला वणवा लागला होता. काही दिवसांपूर्वी
मच्छिमार्केट इमारतीच्या गच्चीवरील गवत पेटले होते. मच्छिमार्केट इमारतीच्या गच्चीवरील गवताची आग फटाक्याचे किटाळ उडाल्याने लागली होती. इतर ठिकाणच्या आगींचे कारण कळू शकले नसले तरी पेटती विडी किंवा सिगारेट टाकणे, वीज वाहिन्यांचे स्पार्किंग होवून त्याचे किटाळ गवतावर पडणे, फुटलेल्या काचेच्या बाटल्यांवर सूर्यप्रकाश पडून निर्माण होणार्या उष्णतेमुळे असे आग लागण्याचे प्रकार घडतात असे अग्निशामक दलाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
चंपक मैदानावरही गवताला आग
बुधवारी सकाळी रत्नागिरीतील चंप मैदानावरील गवताला आग लागली. रत्नगिरी न. प. च्या अग्निशामक बंबाला ही आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन फेर्या माराव्या लागल्या. दरवर्षी या मैदानावर उगवलेल्या सुकलेल्या आग लागण्याच्या घटना घडत आहेत.