रत्नागिरी : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचवेळी रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्या जवळच्या शिवसृष्टीत उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा अरबी समुद्राच्या काठावरचा पहिला पुतळा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यावेळी केले.
शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे हे लोकार्पण असून, लवकरच दुसरा टप्पाही पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही उपस्थित शिवप्रेमींना पालकमंत्र्यांनी दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नदुर्ग किल्ला येथील शिवसृष्टीसाठी १७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा २४ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. सोमवारी या शिवसृष्टीचे पालकमंत्र्यांनी लोकार्पण केले. यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण शिवसृष्टीची फिरून पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पूजार, मुख्याधिकारी तुपार बाबर, पोलिस उपअधीक्षक नीलेश माईनकर, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक आणि शिकोमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी या शिवसृष्टीचे लोकार्पण होणार होते; परंतु विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि बारा सुरू झाल्याने हा कार्यक्रम रद्द झाला होता. लोकार्पणासाठी जमलेल्या लोकांची पावसामुळे गैरसोय झाली. पावसाच्या या व्यत्ययामुळे उपस्थितांना जो त्रास झाला त्याबद्दल पालकमंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारका संदर्भात सुप्रिम कोर्टात रिट पिटीशन प्रलंबित आहे. त्याच अरबी समुद्राच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला भव्य पुतळा साकारला गेला आहे, याबाबत अभिमान वाटत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना सांगितले. रात्री उशिरा सोहळा झाला तरीही शिवप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.