

देवगड ः मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली देवगड बंदरातील ‘त्रिवेणी’ नौका बंदराकडे परत येत असतानाच गिर्ये-काळोशी समुद्रात 10 वाव अंतरावर बुडाली. वादळी वार्यामुळे नौकेच्या तळाकडील दोन लाकडी फळ्या उचकटल्याने नौकेत पाणी शिरून ही नौका पूर्णपणे बुडाली. गुरुवारी (18 सप्टेंबर) सायंकाळी 7.30च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
देवगड येथील राजेंद्र बाळकृष्ण भिल्लारे यांच्या मालकीची ही नौका होती. सुदैवाने दुसर्या नौकेची तत्काळ मदत मिळाल्यामुळे कार्यामुळे ‘त्रिवेणी’ नौकेवरील सर्व सहा खलाशांना सुखरूप वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेतन नौकेसह त्यावरील साहित्याचे मिळून 25 लाखांचे नुकसान झाले, अशी माहिती देवगडचे सहा. मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी दिली.
‘त्रिवेणी’ ही यांत्रिक नौका गुरुवारी सकाळी समुद्रात मच्छीमारीसाठी गेली होती. नौका गिर्ये काळोशी समुद्र परिसरात 10 वाव क्षेत्रात मासेमारी करत होती. दरम्यान हवामान विभागाने वादळी वार्याची सूचना दिल्याने नौका गुरुवारी देवगड बंदरात परतत होती. दरम्यान नौकेच्या खालील बाजुच्या दोन फळ्या उचकटल्या गेल्या व नौकेत पाणी शिरले.