गावखडी कासव संवर्धन केंद्रात यंदा ७९ घरटी

Ratnagiri news | उर्वरित पिल्लेही कालावधी पूर्ण होताच येत्या काही दिवसांत समुद्राकडे झेपावणार आहेत
गावखडी कासव संवर्धन केंद्रात यंदा ७९ घरटी
Published on
Updated on

पावस : तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावरील कासव संवर्धन केंद्रात यंदाच्या हंगामात ७९ घरट्यांमधून एकूण ८,४४५ अंडी संरक्षित करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत ४,५३५ ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. उर्वरित पिल्लेही कालावधी पूर्ण होताच येत्या काही दिवसांत समुद्राकडे झेपावणार आहेत.

गावखडी समुद्रकिनारा हा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांसाठी पोषक व सुरक्षित अधिवास मानला जातो. दरवर्षी मोठ्या संख्येने कासवे येथे अंडी घालण्यासाठी येतात. या अंड्यांचे संरक्षण कासवमित्र आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. या संवर्धन उपक्रमामुळे दरवर्षी घरट्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

यंदा ८ जानेवारी २०२६ रोजी हंगामातील पहिले घरटे आढळले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने घरटी सापडत गेली आणि त्यामधील अंडी सुरक्षित ठेवण्याचे काम सातत्याने करण्यात आले. अंड्यांपासून तयार होणारी पिल्लेही योग्य कालावधीनंतर समुद्रकिनारी सोडली जात आहेत. कासव संवर्धनाची ही प्रक्रिया गेली अनेक वर्षे यशस्वीपणे राबवली जात असल्यामुळे गावखडी किनारा कासवांसाठी अधिक सुरक्षित ठिकाण म्हणून ओळख निर्माण करत आहे.

पिल्लांना समुद्रात सोडण्याचा नजारा पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. संवर्धन केंद्रात तयार होणारी पिल्ले सुरक्षितरीत्या समुद्रात सोडली जात असल्याने कासवांचा या किनाऱ्यावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुढील काळातही या किनाऱ्यावर कासवांची वर्दळ कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news