

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर वारंवार घडणाऱ्या बुडण्याच्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अभिनव पुढाकार घेतला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘रोबोटिक वॉटर पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव सादर केला असून, हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास राज्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
अलीकडेच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली आहे.
या प्रस्तावानुसार समुद्रकिनाऱ्यावरील धोकादायक भागांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित निरीक्षण व्यवस्था, सेन्सरयुक्त अलर्ट प्रणाली, ड्रोनद्वारे देखरेख, रोबोटिक बचाव उपकरणे, स्वयंचलित इशारा यंत्रणा तसेच पर्यटकांना सुरक्षित जलक्रीडेचा अनुभव देणाऱ्या सुविधा विकसित करण्याचा विचार आहे. या प्रणालीमुळे धोक्याची पूर्वसूचना मिळण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य अधिक जलद आणि प्रभावीपणे करता येणार असल्याचे अपेक्षित आहे.
गणपतीपुळे हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. मात्र भरती-ओहोटी, समुद्रातील तीव्र प्रवाह आणि धोकादायक भागांची माहिती नसल्यामुळे अनेक पर्यटक अपघातांना बळी पडतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्तासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे.
‘रोबोटिक वॉटर पार्क’ चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यावर अंतिम निर्णय प्रशासन घेईल. आमच्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पुढाकार घेण्यात आला आहे. हा प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्षात साकार झाल्यास गणपतीपुळे हे केवळ पर्यटनस्थळ न राहता अत्याधुनिक सागरी सुरक्षा व्यवस्थेचे राज्यातील आदर्श मॉडेल ठरू शकते.
नितीन बगाटे पोलीस अधीक्षक