

वैभव पवार
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे 6 जानेवारी रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून एकूण 14 पोलिस अधिकारी आणि 145 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जयगड पोलिस ठाण्याकडून देण्यात आली.
येथील अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवासाठी घाटमाथ्यावरील भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने संस्थान श्री देव गणपतीपुळे, ग्रामपंचायत गणपतीपुळे तसेच पोलिस यंत्रणा व इतर संबंधित यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवासाठी गणपतीपुळे संस्थानकडून दर्शन रांगांवर पाण्याची व लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गणपतीपुळे परिसरात लाईट व्यवस्था तसेच हायमॅक्स दिवे लावण्यात आले आहेत. तसेच येणाऱ्या भाविकांची वाहन पार्किंग व्यवस्था स्मशानभूमी येथील सागर दर्शन पार्किंगमध्ये करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे व ग्रामपंचायत गणपतीपुळे यांनी नेटके नियोजन केले आहे.
या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 14 पोलिस अधिकारी आणि 145 पोलिस कर्मचारी आपली कामगिरी बजावणार आहेत. या अंगारकीला घाटमाथ्यावरून कोल्हापूर, सांगली, सातारा, जत, इस्लामपूर, तासगाव, कराड, इचलकरंजी, कुरुंदवाड, बेळगाव, मिरज आदी ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात भाविक दाखल होणार आहेत. या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून एसटीच्या जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता उघडण्यात येऊन श्रींची पूजाअर्चा, मंत्रपुष्प आरती होऊन दर्शनासाठी भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी रत्नागिरी अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टचे सदस्य पोलिस यंत्रणेला विशेष सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवानिमित्त सायंकाळी साडेचार वाजता गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गे स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येऊन रात्री साडेदहा वाजता मंदिर बंद करण्यात येणार आहे.