

वैभव पवार
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे एक गाव एक गणपती ही शेकडो वर्षांची परंपरा मोठ्या भक्तीभावाने सुरु असून बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीपुळे पंचक्रोशीतील स्थानिक भाविकांनी अतिशय श्रद्धा भावनेने स्वयंभू श्रींचे थेट गणपती मंदिरातील गाभार्यात जाऊन स्पर्श (चरण) दर्शनाचा लाभ घेतला.
येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव सुरू असून बुधवारी श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी सर्व स्थानिक भाविकांना सकाळच्या सत्रात स्पर्श दर्शनाचा लाभ संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे वतीने देण्यात आला. श्रीक्षेत्र गणपतीपुळे जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे .तसेच पश्चिम द्वार देवता म्हणूनसुद्धा श्रीक्षेत्र गणपतीपुळेचे मंदिर प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आपल्या घरोघरी गणपतीची पार्थिव मूर्ती न आणता या मंदिरातच गणेशोत्सव साजरा करतात. त्यामध्ये श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे श्रींचे मंदिर उघडून मंदिराचे मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर व अमित घनवटकर यांनी श्रींची पूजाअर्चा व मंत्रपुष्प केले. त्यानंतर आरती होऊन सर्व ग्रामस्थ व भक्तांना गाभार्यामध्ये जाऊन श्रींचे स्पर्श दर्शन मिळाले. यावेळी पंचक्रोशी ग्रामस्थानी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले . या स्पर्श दर्शनाचा लाभ घेताना स्थानिक ग्रामस्थांनी श्रींच्या समोर श्रीफळ, फुले अर्पण करून मनोभावे पूजा केली.
या स्पर्श दर्शनावेळी स्थानिक ग्रामस्थ आपले गार्हाणे देवाला सांगतात व देवावरील फुलोरा व तीर्थ घेऊन घरी आणून पाटावर त्याची पूजा केली जाते व ते तीर्थ प्राशन करून संपूर्ण घरभर शिंपडले जाऊन उर्वरित तीर्थ विहिरीमध्ये टाकले जाते अशी या परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांची प्रथा आहे. या गणेश चतुर्थीनिमित्त गावातील भजनी मंडळांनी श्रीच्या मंदिरात भजन केले. यावेळी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेमार्फत दर्शन लाईनच्या ठिकाणी देवस्थानचे सुरक्षा रक्षक व गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलिस कर्मचारी यांनी चोख कामगिरी बजावत कुठल्याही स्थानिक भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली गेली या दिवशी सायंकाळी 04:30 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक सोहळा ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाला.