

वैभव पवार
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे गुरुवारी, 22 जानेवारी रोजी माघी यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक भाविकांचा जनसागर उसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. माघी यात्रा ही दरवर्षी स्थानिकांची यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेला गणपतीपुळेबरोबरच नजीकच्या भंडारपुळे, मालगुंड, भगवतीनगर, निवेंडी, चाफे, वरवडे, खंडाळा, जयगड तसेच जाकादेवी, नेवरे, कोतवडे आदी भागातील आणि संपूर्ण रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने श्रींच्या दर्शनासाठी आणि यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त होते.
माघी उत्सवाच्या निमित्ताने गणपतीपुळे येथील देवस्थान समितीकडून अतिशय नेटके नियोजन करण्यात आले असून माघी यात्रेच्या दिवशी पहाटे 5 वाजल्यापासून श्रींचे मंदिर खुले होणार असून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी मंदिराच्या दर्शन रांगांमधून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्थानिक भाविकांना मंदिरात सोडण्यात येणार आहे. येथील गणपती मंदिरात माघी गणेशोत्सवाचे आयोजन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले असून, विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.
माघी यात्रेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक दुकानदार आपल्या विविध वस्तूंची दुकाने घेऊन गणपतीपुळे येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे भाविकांना श्रींच्या दर्शनाबरोबर यात्रेमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. या माघी यात्रेच्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता श्रींची पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदीक्षणामार्गे ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आणि विशेषत: समुद्र किनाऱ्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण माघी यात्रेच्या गर्दीवर जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त बजावला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील सांगितले.