

गणपतीपुळे : जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गणपतीपुळे येथील आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत उभारून जवळपास दोन वर्षे उलटली; मात्र आजतागायत या इमारतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच भाविक आणि पर्यटक यांना रोजच मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत कार्यरत असलेल्या या उपकेंद्रात विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. मात्र, पाण्याअभावी दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून स्वच्छता राखणेही कठीण बनले आहे. आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक क्षेत्रात पाण्यासारखी मूलभूत सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रश्नाबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. संबंधित विभागाला वारंवार माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.
गणपतीपुळे येथे दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येत असतात. किरकोळ आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत अनेकजण या आरोग्य उपकेंद्राचा आधार घेतात. मात्र अशा ठिकाणी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याचे पाहून पर्यटकही आश्चर्य व्यक्त करत असून, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
नुकत्याच मालगुंड ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या जिल्हा परिषद प्रभाग सभेतही हा विषय जोरदारपणे मांडण्यात आला. आरोग्य उपकेंद्रासाठी तातडीने कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी सभेत करण्यात आली आहे.
सुसज्ज इमारत उभारल्यानंतरही दोन वर्षांपासून पाण्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे. आता तरी प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन आरोग्य उपकेंद्राची पाण्याची समस्या कायमची सोडवावी, अन्यथा लोकांचा संताप आणखी तीव्र होईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. दोन वर्षे झाली, आता तरी गणपतीपुळे आरोग्य उपकेंद्राला पाणी मिळणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.