

गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा पावसाळ्यातील धोकादायक स्थितीमुळे सुमारे दोन महिने किनाऱ्यावर दोरी टाकून बंद ठेवण्यात आला होता; परंतु गणपतीपुळे समुद्राची पावसाळ्यातील धोकादायक स्थिती सध्या कमी होऊ लागल्याने तसेच पावसाचा जोरदेखील ओसरत असल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे बीच खुला करण्यात यावा, अशी मागणी केली होती. यामुळे अखेर ग्रामपंचायतीने गणपतीपुळे बीच सोमवारी दुपारपासूनच पर्यटकांसाठी खुला केला आहे.
पर्यटकांसाठी बिच खुला करण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांकडून वारंवार विचारणा केली जात होती; परंतु आपल्या मागणीला यश येत नसल्याने गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी आयोजित विशेष ग्रामसभेची माहिती पर्यटन व्यावसायिक व स्थानिक ग्रामस्थांना मिळताच, त्यांनी थेट ग्रामसभेत जाऊन बीच खुला करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे अखेर ग्रामपंचायतीने गणपतीपुळे बीच हा २४ ऑगस्ट रोजी दुपारपासून पर्यटकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांच्या मागणीला मोठे यश आले असून, संपूर्ण गणपतीपुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. पण गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात न उतरता गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षक आणि पोलिस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.