

वैभव पवार
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे गेल्या चार दिवसांपासून समुद्रात बुडणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामध्ये मागील गुरुवारी सहा जणांना, शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन महिला पर्यटकांना बुडताना वाचवण्यात आले, तर शनिवारी पुण्यातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. यापाठोपाठ रायगड जिल्ह्यातील पेण येथील एका अडीच वर्षीय मुलाला वाचविण्यात यश आले. एका पाठोपाठ एक अशा या घटना घडल्या आहेत. यामुळे येथील समुद्रात पर्यटकांनी समुद्रस्नान करताना मोठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत, देवस्थान समिती आणि गणपतीपुळे पोलिस यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे. या ठिकाणी एका पाठोपाठ एक घटना घडत असल्यामुळे सध्या गणपतीपुळे किनार्यावर जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने मोठी पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिक मोठी मेहनत घेत आहेत.
किनार्यावर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना सूचना देण्याचे काम सर्वच यंत्रणांकडून होत आहेत. याबाबत गणपतीपुळे देवस्थान समिती आणि गणपतीपुळे पोलिस यंत्रणेकडून खास पर्यटकांना समुद्राच्या धोक्याबाबत ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जात आहेत. एकूणच गेल्या चार दिवसांत बुडणार्या पर्यटकांच्या घटनेला पर्यटकांचा अतिउत्साह, बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. स्थानिक व्यावसायिकांच्या जीवरक्षक व पोलिसांच्या सूचनाकडे पर्यटकांचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या घटना घडू लागल्या आहेत. याबाबत पर्यटकांनीही योग्य त्या सूचना लक्षात घेऊन समुद्र स्नानासाठी उतरणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. येथील समुद्रकिनार्यावर कुठलाही धोका उद्भवू नये, या उद्देशाने पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत सुरक्षितता बाळगून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये, समुद्रातील भरती ओहोटीचा वेग, मोठ्या लाटा आणि प्रवाह याविषयीची माहिती स्थानिक व्यावसायिक आणि जीवरक्षकांकडून घ्यावी, तसेच जीवरक्षक आणि वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, समुद्रकिनारी लावलेले लाल झेंडे याबाबत माहिती घ्यावी, तसेच स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
पोलिसांची चोख कामगिरी
गेल्या चार दिवसांत समुद्रात बुडणार्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पोलिस कर्मचारी पर्यटकांना समुद्राच्या धोक्याच्या सूचना देण्यासाठी स्वतः मोठी गस्त घालत आहेत. तसेच समुद्राच्या पाण्यातून पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी सर्वच पोलिस कर्मचारी गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीव रक्षक देवस्थानचे सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने विशेष मेहनत घेत आहेत, यावेळी त्यांना स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांचेदेखील मोठे सहकार्य लाभत आहे. एकूणच समुद्रकिनार्यावर मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने असलेले पोलिस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवत आहेत.