Ganpatipule Angarki Chaturthi : गणपतीपुळ्यात अंगारकीला ५० हजार भाविकांची मांदियाळी!

पहाटे साडेतीनपासून दर्शनासाठी रांगा
Ganpatipule Angarki Chaturthi
गणपतीपुळे : अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींची काढण्यात आलेली पालखी मिरवणूक. (छाया : वैभव पवार)
Published on: 
Updated on: 

गणपतीपुळे : अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवारी (२९ सप्टेंबर) सुमारे ४० ते ५० हजार भाविकांनी स्वयंभू श्रींचे दर्शन घेतले. पहाटे साडेतीन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर भाविकांच्या रांगा लागल्या. रात्री उशिरापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन सुरू होते. पोलिस, देवस्थान समिती, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवकांच्या नियोजनामुळे यात्रोत्सव शांततेत व उत्साहात पार पडला.

मंदिर खुले करण्यापूर्वी मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात स्वतंत्र दर्शन रांगा उभारण्यात आल्या होत्या. रांगेतील भाविकांसाठी पिण्याचे पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

गर्दीचे नियोजन करण्यासाठी जयगड पोलिस ठाण्याच्या अखत्यारित १५ पोलिस अधिकारी आणि १३८ पोलिस कर्मचारी तैनात होते. वाहतूक पोलिसांचाही बंदोबस्तात सहभाग होता. रत्नागिरी येथील श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टच्या स्वयंसेवकांनीही दर्शन रांगेतील गर्दीचे नियोजन करण्यास सहकार्य केले.

भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तैनात होते. आपत्कालीन परिस्थितीसाठी देवस्थान समितीच्या वतीने रुग्णवाहिका, तर आगीची घटना घडल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेचे अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले होते.

घाटमाथ्यावरून विशेष एसटी अंगारकीनिमित्त घाटमाथ्यावरील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी महामंडळाने विशेष जादा बसफेऱ्या सोडल्या. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीसह घाटमाथ्यावरील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक गणपतीपुळ्यात दाखल झाले. भाविकांसाठी विविध ठिकाणी प्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. कोल्हापूर व सांगली येथील काही गणेश मंडळांनी सकाळी खिचडी, तर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप केले. यात्रेनिमित्त विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

रात्री उशिरापर्यंत भाविकांनी शिस्तबद्धपणे दर्शन घेतले. यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news