

रत्नागिरी : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून येणार्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200 बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी असे 13 हजार कर्मचार्यांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था 5 ते 7 जुलैच्या दरम्यान, मोफत करण्यात आली असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे. तसेच आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून अंदाजे 30 ते 35 बसेस पंढरपूरकडे रवाना होतील. या एसटी कर्मचार्यांसाठी पंढरपुरात मोफत नाश्ता, दोन्ही वेळची जेवणाची सोय केली आहे. एसटी कर्मचार्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.
आषाढी वारी काहीच दिवसावर येवून ठेपली आहे. त्यामुळे एसटी विभागाच्या वतीने वारकरी, भाविकांना पंढरपूरला घेवून जाण्यासाठी एसटी बसेसची सोय केली आहे. गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत. ऊन, वारा पाऊस याची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आभाळ होऊ नये, म्हणून यंदा स्व-खर्चाने सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
या निमित्ताने माणसातील विठुराया ची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. अर्थात हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही. त्यामुळे दरवर्षी अशाप्रकारचा उपक्रम राबवणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी जाहीर केले असून कोकणासह राज्यतील विविध विभाग नियंत्रकाना परिपत्रक देवून माहिती देण्यात आली असल्याचे बोरसें यांनी सांगितले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा या विभागातील एस. टी. कर्मचार्यांना जेवणाची सोय केली आहे.
एसटी कर्मचार्यांना पहिल्या दिवशी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत पोहे, चहा, पाणी बॉटल, जेवण 11 ते 3 या वेळेत पायनापल शिरा, जिरा राईस, मिक्स व्हेज, दाल तडका, पापड, लोणचे, चपाती,पाणी बॉटल, सायंकाळी केशरी शिरा, मसाले भात, बटाट, चपाती, सुकी भाजी, पापड, लोणचे दुसर्या दिवशी 6 जुलै रोजी एकादशीनिमित्त साबुदाणा खिचडी, भगर, आमटी, केळी व राजगिरा लाडू, रात्री साबुदाणा खिचडी, भगर, आमटी, केळी, राजगिरी लाडू, 7 जुलै रोजी सकाळी चहा, उपीट, पाणी, दुपारचे जेवण केशरी शिरा,मसाले भात, अख्खा मसूर, चपाती, मटकी मसाला, पापड व लोणचे, पाणी बॉटल, रात्रीच्या पायनापल शिरा, साधा भात, वरण, वांगी, बटाटा मिक्स भाजी, चपाती, लोणचे पापड, 500 मि.ली. पाणी बॉटल.