

रत्नागिरी : तरुणीशी मैत्री करून तिचा आणि तिच्या आईचा विश्वास संपादन करून त्यांचे तब्बल 16 लाख रुपयांचे दागिने बँकेत स्वतःसाठी गहाण ठेवले. त्यानंतर वेळोवेळी संधी देऊनही ते दागिने परत न करणार्या तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 मार्च रोजी सकाळी 10 वा. सुमारास जोशी पाळंद येथे घडली होती. श्रवण सचिन टकेल (वय 21, रा. तारादर्शन अपार्टमेंट, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संशयित श्रवण टकेलने फिर्यादी तक्रारदार महिलेच्या मुलीशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आर्थिक अडचणीचे कारण सांगून तिच्या आईच्या 8 सोन्याच्या बांगड्या, 2 सोन्याचे नेकलेस, 1 बाजूबंद, 1 अंगठी, 1 जोड सोन्याचे गोठ असे 16 लाख रुपयांचे दागिने मुलीकडून घेतले. हे दागिने श्रवणने एका बँकेत, तसेच एका पतपेढीमध्ये गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले; मात्र श्रवणने गहाण टाकलेले दागिने परत केले नाहीत. या प्रकरणी महिलेने गुरुवार 15 मे रोजी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 316(2),318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.