

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर कार्यशाळा घेऊन शिक्षकांमधून तज्ज्ञ मार्गदर्शक घडविणार असून, त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी विशेषकरून कोल्हापुरातून तज्ज्ञ शिक्षक येणार आहेत. त्याचबरोबर दररोज जादा तासही घेण्यात येणार आहे.
खासगी शाळांच्या स्पर्धेत जि. प. च्या मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यालाही यश मिळत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जि. प. शाळांची मुले अव्वल ठरत आहेत. विशेष शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. चार वर्षांपूर्वी गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत स्पर्धा परीक्षांची मेहनत घेण्यात येत आहे. जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षक, मार्गदर्शक पुस्तिका आणि इतर साहित्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत.
सराव घटक चाचण्या तयार करून दर आठवड्याला आयोजित करण्यात येणार आहेत. डेटा विश्लेषण करून या चाचण्यांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजूवर लक्ष केंद्रित करून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षेप्रमाणे एक अभिरूप चाचणी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या स्वरूपाची व मापनाची सवय लावण्यास मदत करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या कमकुवत आणि मजबूत बाजू ओळखण्यास मदत होते, ज्यामुळे ते त्यानुसार अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. सराव चाचण्या आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास आणि परीक्षेचा तणाव कमी करण्यास मदत करतात. परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.