

मंडणगड : राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मंडणगड मधील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आवारात उभारला जाणार आहे. त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांच्या वतीने निविदाही मागवण्यात आली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मंडणगड तालुक्यात प्रथमच उभारला जाणार आहे. बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे हे याच तालुक्यात आहे, त्यामुळे बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या तालुक्याच्या मुख्यालयी बाबासाहेबांचा प्रथमच पुतळा उभारला जाणार असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.
मंडणगडसाठीचे न्यायालयीन कामकाज यापूर्वी दापोली येथे चालत असे. त्यामुळे घटनाकारांच्या तालुक्यात न्यायालय असणे गरजेचे असल्याची अनेक स्तरांतून मागणी व जनभावना लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी दिवाणी न्यायालयास तालुक्यासाठी मंजुरी मिळाली होती,त्यानुसार दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन होऊन न्यायालयाचे कामकाजही सुरू झाले आहे. या दिवाणी न्यायालयासाठी नवीन इमारतीचे बांधकाम सद्या प्रगतीपथावर असून न्यायालयाची प्रशस्त व सुसज्य इमारत पूर्णत्वास जात आहे. आता याच इमारतीच्या आवारात महामानवाचा पुतळा उभारला जाणार आहे. मंडणगड तालुक्यात महामानवाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम मंजूर होणे ही तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद बाब आहे. याबाबत सार्व. बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश वास्ते यांनी माहिती देताना सांगितले की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांच्या वतीने निविदा मागवण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आवारात पुतळा उभारला जाणार आहे, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुतळ्यासंदर्भातील काम सुरू करण्यात येईल.