

पावस : रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावचे आंबा बागायतदार प्रदीप आंब्रे यांच्या आंबा बागेतील 2026च्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे येथील मार्केटमध्ये विक्रीला गेली असून, त्यांच्या पहिल्या वहिल्या हंगामातील तीन डझन हापूस आंब्याच्या पेटीला 12 हजार रुपये दर मिळाला आहे.
पांडुरंग आंब्रे हे सुरुवातीला मुंबई मार्केटमध्ये हापूस आंब्याची विक्री करत होते. त्यानंतर त्यांचा मुलगा प्रदीप आंब्रे यांनी पुणे येथे आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या पेट्या थेट ग्राहकांना देण्यास सुरुवात केली. त्यांना मार्केटपेक्षा चांगला दर मिळत असल्यामुळे स्वतः हापूस आंब्याच्या पेट्या विक्रीस उपलब्ध करत होते. गेली दहा-बारा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी पावसाळा उशिरापर्यंत सुरू असताना आंब्याच्या हंगामा संदर्भात थोडीफार धाकधूक होती; परंतु पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात थंडी सुरू झाल्यामुळे हापूस आंब्याला पोषक वातावरण निर्माण झाले. यावर्षीच्या हंगामात लवकर हापूस आंबा तयार झाल्याचे आंब्रे यांनी सांगितले.
यावर्षी 30 जानेवारीला म्हणजे दरवर्षीच्या अगोदरच हापूस आंबा चांगल्यातऱ्हेने तयार झाल्यामुळे तो काढून पुणे येथील मार्केटमध्ये तीन डझनची हापूस आंबा पेटी पाठवली व त्याला मार्केटमध्ये 4000 डझनचा दर मिळाला. तसेच रत्ना जातीचा 11 डझन आंबा मार्केटमध्ये पाठवण्यात आला. त्यालासुद्धा दोन हजार रुपये डझनप्रमाणे भाव मिळाला. त्यामुळे सुरुवातीच्या काढणीमध्ये चांगल्यातऱ्हेने आंबे काढून मार्केटमध्ये प्रथमच पाठवल्यामुळे दर चांगल्या मिळाल्याचे सांगितले.
प्रदीप आंब्रे म्हणाले की, 2026 सिझनची पहिली मुहुर्ताची पेटी पुणे मार्केटमध्ये शांतीलाल शहा यांच्या पेढीवर 3 डझन पेटीला 12000 रुपयांचा दर मिळाला. बागेमध्ये हापूस आंब्याची देखभाल करीत असताना रिच फ्लोराज कंपनीची सेंद्रिय खते, औषधे, यतिन मोकल व पूजा पुजारी यांचे शास्त्रीय योग्य मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच यावर्षी लवकर व चांगल्या तऱ्हेचा तयार आंबा बाजारामध्ये पाठवण्यात यश मिळाले. त्यामुळे यापुढे खऱ्याअर्थाने मोठ्याप्रमाणात आंब्याची आवक सुरू होईल आणि ती पुणे येथील आपल्या दुकानांमध्ये थेट विक्री केली जाणार आहे. दरवर्षीच्याया थेट विक्रीमुळे आंब्याला चांगला भाव मिळतो. मात्र सुरुवातीला या पेट्यांना बोली लावून आंब्याची विक्री केल्याचे सांगितले.