

रत्नागिरी : कोकणातील हापूस आंब्याचा नियमित हंगाम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुरू होत असताना गावखडी येथील प्रगतशील आंबा बागायतदार दत्ताराम बाजी पड्यार यांनी ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याची पहिली चार डझनची पेटी तयार करून अनोखा विक्रम केला आहे. पावसाळ्यातील प्रतिकूल वातावरणावर मात करत शेडनेटच्या साहाय्याने आणि नियोजनबद्ध बाग व्यवस्थापनातून त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. संकष्टीच्या मुहूर्तावर तयार झालेल्या या पेटीला तब्बल २१ हजार रुपये अपेक्षित दर मिळणार असून, आंबा व्यावसायिक सतीश जमसिंग पोवार यांनी पहिली पेटी घेण्याचा मान मिळवला आहे.
पड्यार यांचा आंबा व्यवसाय वडिलोपार्जित असून, गेल्या ३१ वर्षांपासून ते या व्यवसायात कार्यरत आहेत. ‘राज मॅंगो’ या नावाने त्यांनी आंबा व्यवसायाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या त्यांच्या चार बागांमध्ये हापूसची सुमारे ५५० कलमे आहेत. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तयार होणारा हापूस रत्नागिरीसह पुणे आणि मुंबईतील ठरावीक ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो. यंदा मात्र नेहमीपेक्षा वेगळा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांच्या बागेतील काही कलमांना दरवर्षी लवकर मोहर येत असला, तरी पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे त्याचे उत्पादनात रूपांतर करण्याकडे विशेष लक्ष देता आले नव्हते.
यंदा जुलै महिन्यात आठ ते दहा कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी हंगामापूर्वी आंबा उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला चार कलमांवरील मोहराचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या.पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक कलमाभोवती प्लास्टिक नेटचे आवरण तयार करून वरून आणि बाजूंनी कलमे संरक्षित केली. यासाठी एका कलमामागे सुमारे दहा हजार रुपये खर्च आला. जुलैपासून दर चार-पाच दिवसांनी बुरशीनाशकांची फवारणी, दर महिन्याला रासायनिक खतांची मात्रा आणि नियमित पाणी व्यवस्थापन यावर भर देण्यात आला. या नियोजनामुळे फळधारणा चांगली होऊन अपेक्षित उत्पादन मिळाले.
विशेष म्हणजे, संरक्षित केलेल्या चार कलमांव्यतिरिक्त आणखी आठ ते दहा कलमांनाही चांगला मोहर येऊन फळधारणा झाली आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी तीन ते चार पेट्या तयार होण्याची शक्यता पड्यार यांनी व्यक्त केली.या प्रयोगासाठी महालक्ष्मी ॲग्रो, रत्नागिरीचे दिलीप डौर आणि हरिश्चंद्र डौर यांचे मार्गदर्शन लाभले.
योग्य नियोजन, संरक्षणात्मक उपाययोजना आणि सातत्यपूर्ण देखभाल यामुळे ऑक्टोबरमध्ये हापूसची पेटी तयार करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे पड्यार यांनी सांगितले. हंगामापूर्वी हापूस उत्पादन घेण्याच्या या प्रयोगामुळे गावखडीसह जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे लक्ष वेधले गेले आहे.