

नाटे : राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेसाठी शनिवारची रात्र काळरात्र ठरली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि पाहता पाहता सात दुकाने जळून खाक झाली. या आगीच्या भक्ष्यस्थानी अनेकांचे संसार पडले आणि लाखोंचे नुकसान झाले. मात्र, या आपत्तीच्या काळात नाटे गावातील तरुणांनी दाखवलेले धाडस आणि धर्मभेद विसरून मदतीला धावलेल्या गावकर्यांमुळे माणुसकीचे अनोखे दर्शन घडले.
राजेश दत्ताराम पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीत ही सात दुकाने थाटली होती. रात्रीच्या शांततेत अचानक आगीच्या ज्वालांनी आणि धुराच्या लोटांनी परिसर व्यापला, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने, इमारत निवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच यातील दिलासादायक बाब होती.
आगीची माहिती मिळताच, नाटे आणि साखरी-नाटे येथील तरुण जीवाची पर्वा न करता मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी धगधगत्या आगीत आणि धुराच्या साम्राज्यात दुकानांच्या पत्र्यांवर चढून आत असलेले सात ते आठ गॅस सिलिंडर बाहेर काढले. यातील काही सिलिंडर भरलेले होते. जर यातील एकाचाही स्फोट झाला असता, तर संपूर्ण बाजारपेठ हादरली असती आणि दुर्घटनेची तीव्रता कित्येक पटींनी वाढली असती. या तरुणांच्या धाडसामुळेच हा संभाव्य अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अश्वनाथ खेडेकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. राजापूर नगर परिषदेचे अग्निशमन दल रात्री अडीचच्या सुमारास पोहोचले आणि सकाळपर्यंत अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, त्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल. या घटनेने नाटे बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले असले तरी, येथील सामाजिक सलोखा आणि एकजुटीने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
- दिगंबर गिजम: उपहारगृह (फर्निचर आणि किचन साहित्य जळाले)
- भीम खंडी: चायनीज फास्ट फूड सेंटर
- प्रदीप मयेकर: टेलरिंग शॉप (शिलाई मशीन आणि कपडे भस्मसात)
- केदार ठाकूर: कापड आणि प्लास्टिक वस्तू विक्रीचे दुकान
- प्रसाद पाखरे: फोटो स्टुडिओ (कॅमेरे, संगणक आणि प्रिंटर जळाले)
- निकिता गोसावी: ब्युटी पार्लर
- नारायण गोसावी: कटलरी साहित्याचे गोदाम
या कठीण प्रसंगी मजीद गोवळकर आणि त्यांच्या सहकार्यांनी धर्म, जातपात विसरून माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी रात्रभर आग विझवण्यासाठी पाण्याचा पुरवठा सुरू ठेवला. ही केवळ आग नव्हती, तर माणुसकी जपण्याची एक संधी होती, या त्यांच्या शब्दांनी उपस्थितांची मने जिंकली.