

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू बांबाडे यांच्या काजू प्रक्रिया असलेल्या इमारतीला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. देवरुख नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दुर्घटनेत सुमारे 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.
चंद्रकांत बांबाडे यांच्या काजू फॅक्टरी असलेल्या इमारतीत काजू सोलण्याची किमती असलेली प्रक्रिया यंत्रणा तसेच काजू बिया तसेच अन्य सामान मोठ्या प्रमाणात होते. ते आगीत जळून खाक झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल होण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. ग्राम महसूल अधिकारी विलास गोलप, संदेश घाग, पोलिस पाटील अनंत (अप्पा) पाध्ये हे आगीच्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आग आटोक्यात येत नसल्यामुळे देवरुख नगर पंचायतीच्या अग्निशामन बंबाला पाचारण करण्यात आले. हा बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. बंबाने आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तत्पूर्वीच मशिनरी व काजू बियांसह असलेला माल जळून खाक झाला. यामध्ये भांबाडे यांचे सुमारे 60 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.