

गुहागर शहर : मी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचा थलसेनेचा आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून संशयित प्रथमेश शांताराम येवले (वय 25, मूळ रा. औंध, ता. खटाव. जि. सातारा) जानवळे गावामध्ये काही दिवस फिरत होता. मात्र, तो अचानकच लोकांना शिवीगाळ व धमकी देऊ लागल्याने लोकांना त्याचा संशय येऊ लागला. लोकांनी लागलीच गुहागर पोलिस ठाण्याशी संपर्क करून याबाबत माहिती पोलिसांनी दिली.
यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुहागर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक स्वामिनी नाटेकर यांनी या बाबतची फिर्याद गुहागर पोलिस ठाण्यात दिली आहे. यानुसार संशयित आरोपी प्रथमेश शांताराम येवले (25, मूळ रा. औंध, ता. खटाव. जि. सातारा, सध्या राहणार जानवळे, ता. गुहागर) याच्यावर बनावट आयएएस या पदाचे ओळखपत्र तयार करून लोकांना शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
प्रथमेश येवले या तरुणाने आयएएस या पदाचे बनावट ओळखपत्र तयार करून दिनांक 17 मे 2025 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते आजतागायत जानवळे गावातील अनंत नंदन पार्क, जानवळे (तालुका गुहागर) या सोसायटीमध्ये राहणारे अनिल रहाटे, राम गौंदा, भीमराव सपकाळ व अन्य काही रहिवाशांना आपण आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी या बनावट आयएएस अधिकारी प्रथमेश येवले याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 204,336(2) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री. भोपळे करीत आहेत.