

राजापूर : पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत (इको-सेंसिटिव्ह एरिया) केंद्र शासनाने २७ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या सातव्या मसुदा अधिसूचनेनंतर राजापूर तालुक्यातील प्रस्तावित गावांच्या यादीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. तालुक्यातील ५१ गावांचा समावेश प्रस्तावित असल्याचे नमूद असले, तरी यादीतील काही गावांच्या नावांमुळे नेमकी कोणती महसुली गावे या क्षेत्रात समाविष्ट आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यादीतील ‘पाल्ये’ हे नाव नेमके कोणत्या महसुली गावाचे आहे? ‘वाडा पालये’चा त्यामध्ये समावेश आहे का? राजापूर तालुक्यात एकाच नावाच्या तीन ‘वरचीवाडी’ आहेत. त्यापैकी नेमकी कोणती वरचीवाडी प्रस्तावित क्षेत्रात आहे? तसेच ‘वाल्ये’ आणि ‘विलये’ या वेगवेगळ्या गावांच्या नावांमुळेही संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून गावांच्या नावांसह महसुली हद्दींची स्पष्टता होणे आवश्यक आहे. इको-सेंसिटिव्ह क्षेत्र निश्चितीचा विषय केवळ गावांच्या नावांपुरता मर्यादित नाही. त्याचा थेट संबंध भविष्यातील विकासकामे, खाणकाम, उत्खनन, मोठे बांधकाम प्रकल्प आणि पर्यावरणीय निर्बंधांशी आहे. त्यामुळे अधिसूचनेतील गावांची ओळख आणि त्यांच्या भौगोलिक सीमा अचूक असणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केंद्राच्या सातव्या मसुद्यानुसार पश्चिम घाटातील एकूण ५६ हजार ८२५.७ चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुमारे १७ हजार ३४० चौरस किलोमीटर क्षेत्राचा त्यामध्ये समावेश असून, राज्यातील १३ जिल्ह्यांमधील ५६ तालुके आणि २ हजार ५१५ गावांचा समावेश प्रस्तावित आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील ३११ गावे प्रस्तावित क्षेत्रात येतात. त्यापैकी राजापूर तालुक्यातील ५१ गावांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या मसुद्यात नवीन खाणकाम, उत्खनन आणि वाळू उत्खननावर निर्बंध, नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्पांवर बंदी, काही अत्यंत प्रदूषणकारी उद्योगांना प्रतिबंध तसेच मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर निर्बंध प्रस्तावित आहेत. त्यामुळे कोणते महसुली गाव, त्याची कोणती हद्द आणि नेमका कोणता भौगोलिक भाग या अधिसूचनेच्या कक्षेत येतो, याची माहिती मिळणे गरजेचे आहे.
प्रस्तावित ५१ गावांची यादी...
वाटूळ, कुंभवडे, शेजवली, मोसम, पन्हळे तर्फे सौंदळ, पांगरे बुद्रुक, कोळवणखडी, हर्डी, पाथर्डे, केळवडे, खिणगिनी, आग्रेवाडी (कोतापूर), कोतापूर चिखले, कोंडदसूर, बागकाजी हुसेन, गोठणे दोनिवडे, वरची गुरववाडी, भराडे, कोंडसर खुर्द, हसोळ तर्फे सौंदळ, जांभवली, फुपेरे, ओशिवळे, सौंदळ, तिवरे, प्रिंदावन, बांदिवडे, वालये, महाळुंगे, डोंगर, धामणपे, हातदे, काजिर्डा, करक कारवली, कोळंब, मिळंद, पाचल, पहिलीवाडी (ताम्हाणे), पांगरे खुर्द, परुळे, पाटकरवाडी, कोंडये तर्फे राजापूर, सावडाव, वाल्ये (पाल्ये), वरचीवाडी, वाळवड, येरडव, झर्ये आणि हरळ.