Ratnagiri : जिल्ह्यात महायुतीला बळ की भाजपचा ‘उदय’?

उद्योजक प्रशांत यादव यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढण्यास मदत
Ratnagiri News
Ratnagiri : जिल्ह्यात महायुतीला बळ की भाजपचा ‘उदय’?
Published on
Updated on

चिपळूण : राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी महायुतीचा मुख्य घटक पक्ष असणार्‍या भाजपमध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली असून महायुतीलादेखील बळ मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा ‘उदय’ झाला आहे.

चिपळूणचे राजकारण आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. गेल्या 30-35 वर्षांचा इतिहास लक्षात घेता चिपळूणचे राजकारण माजी आमदार रमेश कदम आणि आमदार भास्कर जाधव यांच्या भोवतीच फिरत आलेले आहे; मात्र आता येथील राजकारणाने वेगळ्या वळणावर वाटचाल सुरू केली आहे. गेल्या दहा वर्षांत चिपळूणमध्ये आ. शेखर निकम यांच्याभोवती येथील राजकारण फिरत आहे. आ. शेखर निकम महायुतीचा घटक पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सामील झाल्यानंतर गत विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून निकम आणि महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या लढतीत निकम यांनी बाजी मारून दुसर्‍यांदा आमदारकी मिळवली तर प्रशांत यादव यांना तब्बल 90 हजार मते मिळाली. नवखा उमेदवार असताना शिवसेना उबाठाचे भक्कम पाठबळ मिळाल्याने त्यांनी ही मजल मारली; मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अल्पावधीत ते भाजपामध्ये सामील झाले आहेत. आता त्यांनी हातात कमळ घेतले आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढली असून चिपळूणचे राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.

प्रशांत यादव यांच्यासाठी शिंदे सेनेने देखील गळ टाकला होता. उद्योगमंत्री ना. उदय सामंत, राजापूरचे आमदार भैया सामंत यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या; मात्र यादव त्यांच्या हाताला लागले नाहीत. प्रशांत यादव यांनी केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणार्‍या भाजपबरोबर जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि आता जिल्ह्याला भाजपाचे नेतृत्व लाभले आहे. रत्नागिरी मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळ माने यांनी ऐन निवडणुकीत उबाठामध्ये प्रवेश करून भाजपाची साथ सोडली. यानंतर जिल्ह्यात भाजपाला नेतृत्वाची गरजच होती. त्यामुळे यादव यांचा भाजपा प्रवेश पक्षासाठी नेतृत्वाची पोकळी भरून काढणारा ठरेल, असा विश्वास नेत्यांना आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना आपले नेतृत्व सिद्ध करावे लागणार आहे.

अनेकवेळा भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. विनय नातू हे ना. उदय सामंत, शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांच्याकडून टीकेचे लक्ष्य झालेले आहेत. त्यामुळे भाजपाला खरंतर खमक्या नेतृत्वाची जिल्ह्यात गरज आहे. त्यामुळे आगामी काळात यादव भाजपाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कितपत मेहनत घेतात हे पाहणे जरूरीचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यात भाजपाला नेेतृत्वाची मोठी गरज आहे. त्यामुळे प्रशांत यादव जिल्हा भाजपाचे नेतृत्व पुढे आणण्यात कशा पद्धतीने वाटचाल करतात हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. आ. निकम आणि प्रशांत यादव यांच्या मतांची बेरीज 1 लाख 90 हजार होते; मात्र यावेळी महायुतीची मते तेवढी होणार नाहीत. कारण शिवसेना देखील दुभंगली आहे. शिंदे गट महायुती बरोबर आहे तर आता उबाठा गटात या मतदारसंघात मोठी पडझड झाली आहे. चिपळुणातील अनेक पदाधिकारी उबाठातून शिंदे गटात गेले तर संगमेश्वरमध्ये बने आणि त्यांचे कार्यकर्ते हे देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघात उबाठा सद्यस्थितीत कमकुवत झाल्याचे दिसून आहे. त्यामुळे या मतदारसंंघात यादवांच्या माध्यमातून भाजपा कितपत ताकद वाढवते हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघात चिपळूण नगर परिषद व देवरूख नगरपंचायतच्या निवडणुका महायुतीसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच पद्धतीने जि. प., पं. स.मध्ये देखील महायुतीची ताकद निर्माण करणे महत्त्वपूर्ण आहे.आगामी काळात भाजपा, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढतात की महायुती म्हणून हे महत्त्वपूर्ण आहे. जर स्वबळावर निवडणुका झाल्या तर चौरंगी लढत होईल. त्यामध्ये कोण किती ताकदीचे हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे आगामी काळ चारही पक्षांसाठी कसोटीचा आहे.

चिपळुणात नेत्यांची फौज...

चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात नेत्यांची माळच आहे; मात्र रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भक्कम पाय रोवले आहे. ते एकमेव नेतृत्व आहेत. त्याच पद्धतीने दापोली-खेड मतदारसंघात ना. योगेश कदम, माजी मंत्री व नेते रामदास कदम यांच्याकडेच नेतृत्व आहे. त्यांनी विरोधी पक्षाचे माजी आमदार संजय कदम यांना आपलेसे करण्यात यश मिळविले. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ एकखांबी झाले आहेत. गुहागर मतदारसंघात मात्र भाजप चाचपडत आहे. शिंदे शिवसेनेने विधानसभेत प्रयत्न केला आणि जोरदार टक्कर दिली. तरीही आ. भास्कर जाधव यांनी निसटता विजय खेचून आणला तर चिपळूण मतदारसंघात देखील संघर्षातून आ. शेखर निकम विजयी झाले. चिपळूण मतदारसंघात शिवसेना उ.बा.ठा.चे नेते आ. भास्कर जाधव, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आ. शेखर निकम, माजी आ. सदानंद चव्हाण, माजी आ. रमेश कदम, संगमेश्वरचे माजी आ. सुभाष बने, त्यांचे सुपुत्र रोहन बने, आ. भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव तर आता नव्याने भाजपमध्ये प्रवीष्ठ झालेले प्रशांत यादव अशी अनेक नेतृत्व निर्माण झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात चिपळुणातील याच नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. स्वबळावर निवडणुका झाल्या तर याच नेत्यांमध्ये मोठी झुंज पाहायला मिळेल; मात्र महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास ‘तुझ्या गळा माझ्या गळा..’ हे चित्रदेखील पाहायला मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news