रत्नागिरी : महामार्ग कामात आपत्कालीन उपाययोजना दुर्लक्षित

चिपळूणमधील स्थिती : अद्याप कार्यवाही नाही; पालकमंत्री ना. सामंत यांची सूचना दुर्लक्षित
Ratnagiri News
रत्नागिरी : महामार्ग कामात आपत्कालीन उपाययोजना दुर्लक्षित
Published on
Updated on

चिपळूण शहर : पालकमंत्री उदय सामंत यांनी दि. 3 मे रोजी चिपळुणातील प्रशासकीय बैठकीदरम्यान महामार्ग विभाग, जीवन प्राधीकरण विभाग यांना चिपळूण नगर परिषदेेने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत दिलेल्या सूचना आराखडानुसार तातडीने काम करावे, असे आदेश देऊनही अद्यापपर्यंत संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा महामार्ग परिसरात पाणी तुंबण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर पाणी-पाणी करण्याची वेळ येणार आहे.

दिनांक 3 मे रोजी ना. उदय सामंत यांनी चिपळूण दौर्‍यात सांस्कृतिक केंद्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. बैठकीदरम्यान शिव व वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा तसेच शहरातून जाणार्‍या सुमारे 4 कि.मी. लांबीच्या महामार्ग रूंदीकरण अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीचे काम तसेच मोर्‍या व सांडपाण्याच्या निचर्‍यासाठी आवश्यक नियोजन करण्याची सूचना संबंधित विभागाला देऊन तातडीने काम करण्याचे तोंडी आदेश दिले होते. या बाबत चिपळूण न.प.ने ना. सामंत यांना महामार्गाचे रूंदीकरण सुरू झाल्यावर महामार्गावर अनेक ठिकाणच्या न.प.च्या अस्तित्त्वात असलेल्या मोर्‍या बुजविल्या गेल्या. तसेच पाणी साठवण टाक्यांसाठी असणार्‍या जलवाहिनीला अनेक ठिकाणी कामादरम्यान गळती लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्या-त्या भागाचा पाणीपुरवठा ठप्प होत आहे. या जलवाहिन्या योग्य ठिकाणी बसविण्याचे काम संबंधित विभागाच्या माध्यमातून व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ठेकेदाराच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे. मात्र, संबंधित विभागाकडून ना. सामंत यांनी सूचना दिल्यानंतर अद्याप कोणतेही काम पूर्णत्वास गेले नाही. या बाबत न.प.ने नियोजित आराखडा देताना शहरातून 4 कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जात आहे.

बहादूरशेख नाका ते शासकीय विश्रामगृह या दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गापासून चिपळूण शहरातील नागरिकांनी पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेली गटारे व मोर्‍या या बाबत अनेकवेळा तक्रारी झाल्या आहेत.

महामार्गाचे काम करताना संबंधित विभाग, ठेकेदार यांनी नगर परिषदेला विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापपर्यंत न.प. अभियंता यांना कधीही विश्वासात घेतले. परिणामी गेल्या दोन ते तीन वर्षांत पावसाळी हंगामात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून नजिकच्या नागरी वस्तीत शिरण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी होत आहेत. परिणामी नगर परिषद प्रशासन व अभियंत्यांनी संबंधित महामार्गाची पाहणी करून काही उपाय सूचविले आहेत. या उपायांची तातडीने अंमलबजावणी करण्याची तोंडी सूचना व आदेश ना. सामंत यांनी दिले होते. बहादूरशेख नाका बीएसएनएल कार्यालयासमोर क्रॉस मोरीची गरज आहे. या ठिक़ाणी महामार्गाचे काम करताना मोरी टाकण्यात न आल्याने पाण्याचा निचरा होत नाही. रावतळे बांधकाम भवन कदम घराशेजारी क्रॉस मोरी व पाण्याची पाईपलाईन असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. डीबीजे महाविद्यालय ते उमेश सकपाळ संपर्क कार्यालय मार्गावर पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सुविधा नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडत अहेत.

ओझरवाडी इंदिरा अपार्टमेंट जवळील महामार्गाची भराव टाकून उंची वाढविल्याने या ठिकाणची गटारे व मोर्‍या बंद आहेत. यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. हॉटेल रॉयल पॅलेस शेजारी हायवे क्रॉस मोरीची सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने पाण्याची निचर्‍याची क्षमता असणारी आवश्यक मोरी गरजेची आहे, पाग पॉवर येथे क्रॉस मोरी नसल्याने पाणी साचून राहात आहे तर महामार्गाच्या दोन्ही बाजूने बांधलेल्या गटारामध्ये कोणत्याही स्वरूपाचे पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने महामार्गावरच पाणी तुंबून राहात आहे. अनेक ठिकाणची महामार्ग विभागाने बांधलेल्या गटारांची दुरवस्था झाली आहे. याच मार्गावर 300 मि.मी.ची मुख्य जलवाहिनी स्थलांतरित न करता महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news