

गुहागर : कोकणात अनेक योजना आणतोय. कोस्टल मार्ग नवी मुंबई-सिंधुदुर्ग मार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग पुढच्या वर्षी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. चुकीचे ठेकेदार मिळाल्याने या कामाला उशीर झाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तालुक्यातील हेदवतड येथील खारवी समाजाच्या सभागृहात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या नेत्रा ठाकूर, पडवे जि.प. गटाचे माजी सदस्य व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी आपल्या सहकार्यांसमवेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते.
या प्रवेश कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, त्यावेळी माजी आमदार संजय कदम, नेत्रा ठाकूर व महेश नाटेकर जर आपल्या पक्षांमध्ये आले असते तर आजचे चित्र वेगळे दिसले असते. मात्र, यापुढील आमदार हा आपला असेल याच्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. कष्टकर्यांना न्याय देण्यासाठी आम्ही उठाव केला. सर्व कामांना स्टे होता व तो आपण काढून टाकला. जे कोर्टात गेले ते द़ृष्ट भाऊ या सर्वांना आपली जागा दाखवत बहिणींनी आपले 232 आमदार महाराष्ट्रात निवडून दिले.
यावेळी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, आजचा हा पक्षप्रवेश दहा हजार मतदारांसह पक्षप्रवेश आहे. जर निवडणुकीच्या अगोदर या प्रवेशाची बुद्धी झाली असती तर आज राजेश बेंडल यांच्या रूपाने आमदार उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसले असते. अजूनही संधी गेलेली नाही. यापुढे गुहागर नगर पंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे. नेत्रा ठाकूर यांना नियोजन मंडळाच्या सदस्य पदावर घेण्याचे जाहीर झाले होते व त्यांना आम्हाला त्यावेळी आरोग्य शिक्षण सभापतीपद देता आले नाही, परंतु नियोजन मंडळावर सदस्यपद देत असताना आदल्या रात्री त्यांचं नाव कमी झाले. मात्र त्यावेळेला मी मदत करू शकलो नाही ही कसर यावेळी भरून काढणार असून नेत्रा ठाकूर यांना योग्य पद दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या नेत्रा ठाकूर, पडवे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, गुहागर पंचायत समिती माजी सभापती विलास वाघे, दत्ताराम निकम, विभाग प्रमुख व माजी सरपंच समीर डिंगणकर, विनायक कांबळे, वेळणेश्वर माजी सरपंच नवनीत ठाकूर, हेदवी सरपंच आर्या मोरे, साखरीआगर सरपंच दुर्वा पाटील, पिंपर सरपंच अनिल घाणेकर यांच्यासह अनेक उबाठाचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे हजारो कार्यकर्ते, मुंबईतील कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, माजी आमदार संजय कदम, माजी सभापती विलास वाघे, बाबू म्हाप, गुहागर विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख विपूल कदम, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, नीलेश मोरे, अमरदीप परचुरे, रामचंद्र हुमणे, पांडुरंग पाते, नीलेश डिंगणकर, तुकाराम निवाते आदी उपस्थित होते.