

खेड : दापोली शहरातील नाट्यगृहासाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून 15 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. तसेच मीनाताई ठाकरे केंद्रासाठी 80 लाखांची मंजुरी जिल्हा नियोजन समितीमार्फत तत्काळ दिली जाईल. याचबरोबर खेड बसस्थानकासाठी 2 कोटींची प्रशासकीय मंजुरी दोन दिवसांत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण रविवारी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, ना. भरत गोगावले, गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम या सोहळ्यास प्रमुख उपस्थित होते.
साडेअकरा कोटींच्या निधीतून सुसज्ज झालेलं हे नाट्यगृह तब्बल अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा रंगकर्मी व रसिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. यावेळी शिंदे पुढे म्हणाले की, हे नाट्यगृह म्हणजे केवळ लोकार्पण नव्हे, ही खेड शहराला आणि कोकणातल्या संस्कृतीला दिलेली बहुमोल भेट आहे. हे नाट्यगृह गडकरी रंगायतनसारखं वाटतं. योगेश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे कार्य सिद्ध केलं. निधी मागताना त्यांनी मतदारसंघाच्या गरजा मांडल्या. मी ‘नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन’ घेणारा नेता आहे. हे नाट्यगृह म्हणजे एक एक भेट आहे, घोषणा नाही. शिवसेनेच्या मुलुखमैदानी तोफेचा, ढाण्या वाघाचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक रामदासभाईंचा आज वाढदिवस आहे. रामदासभाईंनी कोकणात अन्यायाविरोधात उठाव केला. त्याची दखल जगातल्या 32 देशांनी घेतली. जनतेच्या न्यायालयात गेलेल्यांच्या मागे जनता उभी राहते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरू झाले तेव्हा आम्ही उठाव केला आणि मी मुख्यमंत्री झालो. जे लोक योगेश कदम यांच्यावर खोटे आरोप करतात, त्यांनी स्वतः काय केले याचे उत्तर द्यावे. चोर चोर म्हणणार्यांचे खरे स्वरूप जनतेने ओळखले आहे. आरोप करणार्यांची जागा जनता ठरवत असते.