Pudhari Icon Award
चिपळूण : ठाणे येथील नटवर्य डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘दै. पुढारी’च्या 86व्या वर्धापनदिनी माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत लोटेतील उद्योजक डॉ. सतीश वाघ व उद्योजक निलेश चव्हाण यांना ‘पुढारी आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. pudhari photo

डॉ. सतीश वाघ, नीलेश चव्हाण ‘पुढारी आयकॉन’ने सन्मानित

Pudhari Icon : ठाणे येथे ना. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सोहळा; सुभाषराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव
Published on

चिपळूण शहर : माहिती तंत्रज्ञानाला आज अनन्यसाधारण महत्त्व आहे. आगामी काळात महाराष्ट्र या नव्या तंत्रज्ञानातून नवी भरारी घेईल. राज्याच्या प्रशासनात आणि शिक्षण क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा नव्याने विस्तार करू, अशी घोषणा राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ठाणे येथे केली. ‘दै. पुढारी’च्या 86 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘पुढारी आयकॉन’ या पुरस्कारांचे वितरण देखील त्यांच्या हस्ते झाले. लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक डॉ. सतीश वाघ, उद्योजक डॉ. निलेश चव्हाण यांनादेखील यावेळी पुढारी आयकॉन देऊन गौरविण्यात आले.

दै. पुढारीचा 86व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आशिष शेलार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ठाण्याचे खा. नरेश म्हस्के, आ. संजय केळकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, माजी खा. आनंद परांजपे, खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ‘दै. पुढारी’चे मुंबईचे कार्यकारी संपादक विवेक गिरीधारी, निवासी संपादक शशिकांत सावंत, मार्केटिंग हेड अमित तळेकर आदी उपस्थित होते. यावेळी कोकणातील 22 विविध क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांचा पुढारी आयकॉन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये चिपळूणमधून डॉ. सतीश वाघ, उद्योजक निलेश चव्हाण व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना पुढारी आयकॉन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे सुभाषराव चव्हाण उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी त्यांच्या कार्याचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यामध्ये लोटे औद्यागिक वसाहतीमधील सुप्रिया लाईफसायन्स लि. चे संस्थापक व चेअरमन डॉ. सतीश वाघ यांनी या उद्योगात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुढारी महामुंबई आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मूळचे मार्गताम्हाने येथील व पुणे येथे स्कॉन प्रोजेक्ट प्रा. लि.च्या माध्यमातून उद्योग-व्यवसायात यश मिळविलेले चिपळूणचे सुपुत्र उद्योजक निलेश चव्हाण यांनादेखील पुढारी महामुंबई आयकॉन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी ना. आशिष शेलार पुढे म्हणाले, दै. पुढारीच्या सामाजिक व सर्वव्यापी कार्यामुळे पुढारीने हा व्यवसाय सन्मानाने पुढे नेला आहे. ‘दै. पुढारी’ने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांना ताळ्यावर आणण्याचे केलेले काम आणि ‘दै. पुढारी’चे पुढारपण आपल्याला अधिक भावते अशा शब्दांत त्यांनी पुढारीचा आणि पुढारीकारांचा गौरव केला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’चा इशारा देण्यात आला. त्याआधी ‘दै. पुढारी’ वर्तमानपत्र आले. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात या वृत्तपत्राने योगदान दिले. हे काम अतुलनीय आहे, असे उद्गार ना. आशिष शेलार यांनी काढले. खा. नरेश म्हस्के यांनीदेखील, आजच्या जगात तंत्रज्ञानाला महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या अंकामुळे सर्वसामान्यांपर्यंत हा विषय पोहोचला. ‘दै. पुढारी’मुळे आपण घडल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

यावेळी आ. संजय केळकर, अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री शिवाली परब, प्रशासकीय अधिकार्‍यांचा विशेष गौरव करण्यात आला. या सोहळ्यानंतर ‘आयुष्यावर बोलू काही...’ हा संदीप खरे व सलील कुलकर्णी यांचा बहारदार गाण्यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी संपादक शशिकांत सावंत तर आभार मुख्य प्रतिनिधी दिलीप शिंदे यांनी मानले.

‘दै.पुढारी’ सर्व माध्यमात अग्रस्थानी

सर्व माध्यमांमध्ये आज ‘दै. पुढारी’ अग्रस्थानी आहे. वाचकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्यामध्ये हे दैनिक यशस्वी झाले आहे. उद्याचा महाराष्ट्र ज्या तंत्रज्ञानाने पुढे जाणार आहे अशा कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या विषयावर पुढारीने पुरवणी प्रकाशित करून सर्वांसाठीच अभ्यासाचे दालन निर्माण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news