

चिपळूण : सर्वोच्च न्यायालयाने संक्शन पंपाने वाळू उपसण्यावर बंदी घातलेली असतानाही येथील करबंवणे-बहिरवली खाडीत संक्शन पंपाने वाळू उपसा अवैधपणे सुरु आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी होत असल्याने या बाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गंभीर दखल घेत चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांना नुकताच एका पत्राद्वारे जाब विचारला आहे. यावर तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे या वाळूउपशाला कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यातील करंबवणे बहिरवली खाडीत गेल्या काही महिन्यांपासून रात्रदिंवस सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत संबंधित मंडल अधिकारी तलाठी व स्थानिक अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. या वाळू उत्खननांसह होणार्या चोरट्या वाहतुकीच्या अनेक तक्रारी चिपळूण तहसीलदार व महसूल विभागाकडे सातत्याने फोन द्वारे झाल्या आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे चोरटा वाळू व्यवसाय तेजीत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाने येथे कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही छुप्या पध्दतीने हा व्यवसाय चालवला जात आहे.
करंबवणे, मालदोली, चिवेली गावातून संक्शन पंपाव्दारे वाळिउपसा अवैध आणि विनारॉयल्टी वाळू उत्खनन सुरू आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने संक्सनं पंपाने वाळू उत्खनन करण्यास बंदी घातली आहे. तरीही वाळू उत्खनन संक्शन पंपाने होत असल्याबाबतचे तीन तक्रार अर्ज चिपळूण तहसीलदार लोकरे यांच्याकडे देऊनही कारवाई होत नसल्याचे संबंधित तक्रारदाराने जिल्हाधिकार्यांकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या विषयी गंभीरपणे दखल घेत या बाबतचा जाब विचारला आहे.
चिपळूणमधील करंबवणे, मालदोलीसह खेड तालुक्यातील बहिरवली, दिवा बेट, दापोली तालुक्यातील आंजर्ले, केळशी, हर्णे, म्हसोंडा, सारंग, मालदोली, अडखल, मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आदी ठिकाणी सेक्शन पंपाद्वारे वाळू बेकायदेशीर आणि विना रॉयल्टी वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे याठिकाणीही कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच म्हपळ येथे गाळ उपसा करण्याचे काम चालू आहे, त्या गाळाची विल्हेवाट योग्य ठिकाणी करावयाची सूचनाही केली आहे.
गेले काही महिने चिपळूण हद्दीत वाळू उत्खनन पूर्णतः बंद आहे. भरारी पथकामार्फत दिवस रात्र गस्त घातली जात आहे. तसेच तक्रार येतात तातडीने कारवाई देखील केली जात आहे.
प्रवीण लोकरे, तहसीलदार, चिपळूण